हिवरखेड(धिरज बजाज)– अकोला जिल्ह्यातील हिवरखेड शहर आणि परिसरातील आठवडी बाजार कोरोना संकटामुळे बंद असल्यामुळे परीसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सदर भाजीपाला पाळीव जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
हिवरखेड परिसरामध्ये शेकडो शेतकरी बारमाही भाजीपाला उत्पादन घेऊन आपल्या प्रपंचाचा गाडा हाकत आहेत. कोरोनाच्या मागील वर्षीच्या प्रथम लाटेमधील लॉकडाऊन मध्ये सदर शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. त्यामुळे त्यांचे जीवनमान अस्ताव्यस्त झाले होते. शासनाने हळू हळू लॉकडाऊन शिथिल करून पूर्णता मोकळीक दिली असता सदर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडून उधार उसनवारी करून पैशांची जुळवाजुळव एकरी ५०,००० हजार रुपये खर्च करून टोमॅटो, वांगी,व इतर भाजीपाला पीकाची पेरणी केली. सदर मालाच्या दोन तीन तोडणी मध्ये शेतकऱ्यांना बाजार पेठेमध्ये बऱ्यापैकी पैसा करता आला. परंतु गेल्या आठवड्या पासून शासनस्तरावर आठवडी बाजार बंद चे आदेश कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मिळाले. तसेच तालुक्यातील विविध गावातील आठवडी बाजार बंदमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला पूर्ण शेतमाल विक्री करता येत नसल्यामुळे सदर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून तोडून ठेवलेल्या मालाला पाळीव जनावरांना खाऊ घालावा लागत आहे. पर्यायाने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून होत असलेल्या नुकसानी मूळे त्यांच्या प्रपंचाचा गाडा कसा हाकावा व उधार उसनवारी करून शेतीसाठी घेतलेला पैसा कसा फेडावा हा यक्षप्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तसेच भाजीपाला ठोक खरेदीतून चिल्लर विक्री करणारे फेरीवाले, शेतमजूर, आडते आठवडी बाजारातील शेकडो विक्रेते यांचेवर आठवडी बाजार बंदमुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनतेनी काय करावे? याबाबत राज्यसरकारने कोरोना संकट घालविण्यासाठी शेतकरी, छोटे व्यवसायिक, शेतमजूर, यांचा रगडा होणार नाही यासाठी योग्य निर्णय घेऊन लक्ष देण्याची गरज आहे.
आठवडी बाजार नव्हे सर्वसामान्यांचा शॉपिंग मॉल
आठवडी बाजारावर फक्त शेतकरीच नव्हे तर शेकडो किरकोळ विक्रेत्यांची भीस्त असून ग्रामीण विभागाचे अर्थकारण बऱ्याच अंशी आठवडी बाजारावर अवलंबून असते. कापड विक्रेते, जनरल स्टोर्स, धान्य विक्री, पादत्राणे, नमकीन मिष्ठान विक्री, ज्यूस, थंडपेय, झाडू विक्रेते, मसाले विक्री, मटण, चिकन, मच्छी विक्रेते, चाबी बनविणारे, चप्पल दुरुस्ती, इत्यादि शेकडो प्रकारचे व्यवसायिक आठवडी बाजारावर आपला प्रपंच चालवितात. एवढेच नव्हे तर आठवडी बाजारात सर्व वस्तू आणि सेवा अत्यंत माफक दरात मिळत असल्याने हिवरखेड ग्रामीण परिसरातील शेकडो गावांमधील लाखो लोकांची पसंती आठवडी बाजाराला असते म्हणून आठवडी बाजाराला ग्रामीण जनतेचे स्वस्त आणि मस्त शॉपिंग मॉल म्हटल्यास वावगे ठरणार नाही.