अकोला – केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेतंर्गत गावठाणातील सर्व मालमत्तेचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ड्रोन मोजणी प्रकल्पाद्वारे सर्व्हेक्षण होवुन गावठाणातील प्रत्येक मालमत्तेचा नकाशा तयार होणार आहे. या सर्वेक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ मुर्तिजापुर तालुक्यातील खापरवाडा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुर्तिजापुरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते, जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख विलास शिरोळकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारेणीया, उपअधिक्षक नितिन अटाळे, सव्हे ऑफ इंडियाचे ऑफीसर सव्हेअर अनिलकुमार, सव्हेअर चेन चौधरी, गट विकास अधिकारी पायस यांची प्रमुख उपस्थिती होती. अकोला जिल्ह्यात ड्रोन मोजणी द्वारे मालमत्ता मोजणी सव्हेक्षण खापरवाडा येथे करण्यात आले. गावठाणाच्या सर्व मालमत्तेचे सव्हेक्षण ड्रोनद्वारे 10 मिनिटात पुर्ण होवून सव्हेक्षण नकाशे तयार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. येत्या चार महिन्यात 810 गावातील गावठाणाचे सव्हेक्षण करण्यात येणार असुन यासाठी ग्रामविकास विभाग भुमी अभिलेख विभागाचे सहकार्य लागणार आहे. यामुळे गावातील नाले, शेतरस्ते, पांदण रस्ते, अतिक्रमण व मालमत्तेची निश्चिती होणार आहे. गावठाणचे मालमत्तेचे अभिलेख तयार होवुन सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
ड्रोन मोजणी प्रकल्पाचे वैशिष्टे व फायदे
गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाआधारे सर्व्हेक्षण हाऊन, गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार आहे, मिळकत धारकांना आपले मिळकतींचे सीमा व नेमके क्षेत्र माहित होणार आहे, गावठाणातील धारकांना आपले मालमत्तेचे अधिकार अभिलेख पुरावा म्हणजेच मालमत्ता पत्रक (मिळकत पत्रिका) मिळणार आहे, मालमत्ता पत्रक (मिळकत पत्रिका) महणजेच गावठाणातील घर जागेचा मालकी हक्काचा पुरावा असलेने त्या आधारे कर्ज उपलब्ध होऊ शकेल तसेच तारण म्हणुन धारकाला जामीनदार म्हणुन राहता येईल, मालमत्तेचे मालकी हक्क संबंधी अभिलेख व नकाशे तयार झालेने आर्थिक पत उंचावेल, गावठाणतील जागेचे मालकी व हद्दी संबंधी वाद/ तंटे मिटवणेसाठी गावठाण भूमापन अभिलेख कायदेशीर दृष्टया प्रमाणीत मानले जातात त्यामुळे वाद/ तंटे संपुष्टात येतील, गावठाणातील जमिनीचे खरेदी विक्री व्यवहारामध्ये होणारी फसवणुक टाळता येईल, गावठाणातील सार्वजनिक जागा , बखळ जागा, रस्ते , नाले याचे नकाशे व अभिलेख तयार होणार असलेने सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण होणार आहे.