अकोला: खोलेश्वर येथील रहिवासी तथा गिट्टी खदान व्यावसायिक गोपाल अग्रवाल यांची शनिवारी MIDC परिसरात गोळया झाडून हत्या झाल्याची घटना घडली होती. यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तातडीने पथकाचे गठण करून, अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू केला होता. अग्रवाल यांच्या सोबत असलेल्या संशयितांना ताब्यात घेवून, रविवारी पोलिसांनी झडती घेतली होती. या चौकशीत चार आरोपींची नावे समोर आली असून, आज सोमवारी चारही आरोपींची ओळख अकोला पोलिसांनी उघड केली.गोपाल हनुमंतप्रसाद अग्रवाल (४५) यांच्या भावाचे बोरगाव मंजू येथे गिट्टी खदान आहे. या गिट्टी खदानवर व्यवस्थापक असलेले गोपाल यांनी काही कामगारांना कामावरून कमी केले होते, याचा राग मनात ठेवून गोपाल अग्रवालचा खातमा करण्याचा कट गुन्हेगारांनी रचला होता. नियोजित केल्यानुसार शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान आरोपींनी गोपाल अग्रवालचा गोळ्या झाडून खातमा केला. त्यांच्याकडील अंदाजे दोन लाख रुपयांची रोकडही लुटली. गोपाल अग्रवाल यांचा वाढदिवस असलेल्या दिवशीच त्यांची हत्या करण्याचा कट आरोपींनी केला होता.मनात प्रचंड द्वेष पाळून हत्याकांड घडविल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली.या प्रकरणात रविवारी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेक-यां विरुद्ध भारतीय दंड विधान व आर्म ॲक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी तातडीने घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध सुरू केला होता. घटनेच्या २४ तासांच्या आतच पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली होती. यावरूनच काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली.आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली. सोमवारी या घटनेतील आरोपींचा चेहरा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन समोर आणला.
गोपाल अग्रवाल यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या बांधल्या. घटनेची माहिती मिळाली तेंव्हापासूनच पोलीस आरोपींच्या मागावर होते. मुख्य आरोपीस २४ तासांत बेड्या ठोकण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मुख्य आरोपी सागर प्रकाश काठोळे याच्यासह सह आरोपी विजय अंबादास राठोड, रणधीर भारत मोरे,लखन वसंता राठोड यांना जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (अकोला) यांनी दिली.