वाडेगांव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून फोटोथेरपी युनिट व रेडीयम वार्मरमशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात ह्या मशीन ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करून मशीन सुरू करण्यात न आल्याने लाखो रुपयाच्या मशीन गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहेत.
नवजात शिशु बालकावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार व्हावा यासाठी आरोग्य विभागाच्या आय पी एच एस योजने अंतर्गत आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्च करून फोटोथेरपी युनिट व रेडियम वार्मर ह्या दोन मशीन २० मार्च २००९ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र सदर मशीनला आवश्यक असलेली खबरदारी व मशीन ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात न आल्याने ह्या मशीन बंद अवस्थेत गेल्या अनेक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टोअर रूममध्ये धूळखात पडून आहेत. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी फोटोथेरपी युनिट व रेडियम वार्मर हया मशीन ठेवण्यासाठी आरोग्य केंद्राच्या आवारात स्वतंत्र कक्ष उभारून त्वरित सुरू करण्यासंबंधी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांना आदेशीत केले होते. तरीसुद्धा संबंधित तात्कालीन वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित सदर मशीन सुरू केल्या नसल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या तात्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.