अकोला: शहरातीलसिव्हिल लाईन पोलिस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या आकाशवाणी केंद्र येथील टॉवरवर चढून दोन युवा शेतकऱ्यांनी शोले स्टाईल पद्धतीने आंदोलन केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली आहे. या युवा शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे.
शहरातील सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनच्या अगदी समोरच अकोला आकाशवाणीचे केंद्र असून याठिकाणी लावण्यात आलेल्या टॉवरवर आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास दोन युवा शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सोसायटीने शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या व काही शेतकऱ्यांच्या सह्या न घेता परस्पर कर्जाचे पुनर्गठन केले. त्यामुळे जिल्यातील 17 हजार 700 च्यावर शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कपाशी सोयाबीन, उडीद, मूग या नगदी पिकांचे मोठ्या प्रमात नुकसान झाले. त्यामुळे तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत करावी या दोन मागण्यासाठी
युवा शेतकरी आकाशवाणीच्या टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच सिव्हील लाईन पोलीस, शहर वाहतूक शाखा, दंगल नियंत्रण पथक आदींनी घटनास्थळी धाव घेऊन युवकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षय पोहरे, गोपाल अंबादास साबळे असे या युवा शेतकऱ्याचे नाव असून ते बाळापूर तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली असून युवकांना खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आकाशवाणी केंद्राला छावणीचे स्वरूप
या दोन्ही युवा शेतकऱ्यांनी सिने स्टाईल आंदोलन करून घोषणाबाजीही केली. यावेळी परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम सिव्हिल लाईनचे भानुप्रताप मडावी, वाहतूक शाखेचे गजानन शेळके, रामदासपेठ पोलिस स्टेशनचे आव्हाळे, फायर ब्रिगेड, दंगा नियंत्रण पथक आदींनी घटनास्थळी धाव घेतली आहे.