अकोला,दि. 20 (जिमाका)- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल योजना, भेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना योजना राबविण्यात येत आहे.
20 टक्के बीज भांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून राबविण्यात येते. यामध्ये महामंडळाचा 20 टक्के, लाभार्थींचा 5 टक्के तर बँकाचा 75 टक्के सहभाग असतो, या योजनेमध्ये महत्तम प्रकल्पाची मर्यादा 5 लक्ष आहे, त्याचा व्याजाचा दर 6 टक्के असून परतफेडीचा कालावधी पाच वर्ष आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता अर्जदारांचे वय 18 ते 50 वर्ष असावे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लक्षपर्यंत असावे.
थेट कर्ज योजनाकरीता अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता रु 1 लक्ष असावे, तर अर्जदाराचे सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 इतका असावा, तसेच नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रु. 2085/- परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावी लागणार नाही. परंतु थकित झालेल्या हप्त्यांवर शेकडा चार टक्के व्याजदर आकारण्यात येईल.
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनाकरीता अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र, इत्यादी व्यवसायाकरीता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करुन दिल्या जाईल. ही योजना ऑनलाईन असून वेबपोर्टल किवा महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील, बँकेमार्फत लाभार्थींना रु. 10 लक्षपर्यंत कर्ज वितरीत केले जाईल, कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थींच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत, कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8 लक्ष राहील.
गट कर्ज व्याज परतावा योजना महामंडळाच्या निकषानुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांचे बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणी करिता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. परतफेडीचा कालावधी पाच वषापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कालावधी कमी असले तो, गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास जास्तीत जास्त 12 टक्के दराच्या आणि रु. 15 लक्ष मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. इतर कोणतेही महामंडळ अदा करणार नाही. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील, गटातील लाभार्थ्यांचे किमान वय 18 ते 45 वर्ष असावे, यापुर्वी महामंडळाच्या वा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा वैयक्तिक लाभ घेतलेला नसावा, गटांच्या भागीदारांचे किमान रु. 500 कोटीच्यावर ठेवी असलेल्या व कोअर बँकींग सिस्टम असलेल्या राष्ट्रीयकृत व शेड्युल्ड बँकत खाते असावे, गटातील सर्व सदस्यांचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 इतका असावा, तसेच गटातील उमेदरवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक राहील.
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर भेट दयावी. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्तीय आणि महामंडळ मर्या. अकोला या कार्यालयासी संपर्क साधावा.