अकोला – कोविड-19 चा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता शरिरामधील रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हा एक महत्वाचा उपाय आहे. यासाठी येत्या 20 सप्टेंबर पासून जिल्ह्यात पंधरवाडा राबविण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्ह्यातील कोविड-19 बाबत आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडनिस, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मिनाक्षी गजभीये, प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख आदी उपस्थित होते.
कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूपासून स्व:ताची काळजी घेणे तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा उपाय आहे. आरोग्य विभागाच्या आयुष विभागाने ‘कोविड-19 प्रतिकारक क्षमतेकरीता उपाय’ ही पुस्तीका तयार केली आहे. या पुस्तीकेचे विमोचन पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी यावेळी केली.
यात सूचवलेल्या उपाययोजनाबाबत जनसामान्यात जनजागृती करणे. त्यातून नागरिकामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणे. हा पंधरवाडा राबविण्यामागचा उद्देश आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणारआहे. आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका व आशा वर्क्स व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत गावागावात प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. यामध्ये सूचवलेल्या छोट्या छोट्या उपाययोजनाबाबत जनसामान्याना माहिती करुन देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात दोन प्रचाररथ ग्रामीण भागासाठी तर शहरी भागासाठी दोन प्रचाररथाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबत सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला पालकमंत्री ना. कडू यांनी दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थॅलेसिमीया सेंटर उभारणार
जिल्ह्यात काही समाजामध्ये थॅलेसिमीया या रोगाचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळून येतात. यासाठी जिल्ह्यात अकोला येथे खाजगी थॅलेसिमीया सेंटर चालविण्यात येते. परंतु जिल्ह्यात शासकीय थॅलेसिमीया सेंटर नसल्यामुळे या आजाराच्या रुग्णाना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किमान 20 खाट्यांचे थॅलेसिमीया, सिकलसेल, हिमोबीलीया या रोगाकरीता सेंटर उभारण्यात येणार आहे.
थॅलेसिमीया आजार वाढू नये यासाठी लग्नाच्या अगोदर थॅलेसिमीयाची तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात यासाठी मोठया प्रमाणात सर्वेक्षण करुन अशाप्रकारचे रुग्ण शोधणे गरजेचे आहे. एनआरएचएम अंतर्गंत प्रत्येक शाळेत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य चाचणी सोबत थॅलसिमीया चाचणी करण्यात यावी, असे निर्देश ना. बच्चू कडू यांनी आरोग्य विभागाला दिले.
वन्य प्राण्यांना आळा घालण्यासाठी टास्क फोर्स
जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठया प्रमाणात सुरु आहे.या वन्यप्राण्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर वन्यविभागाच्या मदतीने टास्क फोर्स तयार करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.