हिवरखेड (धीरज बजाज)- ढगांनी भरलेले नभ.. काळोखी रात्र.. एक माऊली प्रसूती वेदनेने विव्हळत होती.. वेदनादायी प्रवास सुरू होता.. सोबत जीवन मृत्यूचा संघर्ष.. अखेर रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला.. त्या नवजात चिमुकल्याच्या आवाजाने आसमंत हादरून गेले.. हृदय पिळवून टाकणारा हा प्रसंग काळजाचे ठोके चुकविणारा असून हिवरखेड येथील महिलेची रुग्णवाहिकेत प्रसूती झाल्याची घटना घडल्याने हिवरखेड येथे तात्काळ पर्याप्त डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
हिवरखेड येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात अनेक वर्षांपासून डॉक्टरांची कमतरता असल्याने आणि इतरही अनेक पदे रिक्त असल्याने फक्त एका महिला डॉक्टर वर हजारो रुग्णांचा भार असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांचा संपूर्ण भार पडलेला आहे.
ज्या आरोग्यवर्धिनी केंद्रात कमीत कमी तीन डॉक्टर हवे असतात तेथे डॉ.वैशाली ठाकरे ह्या एकमेव डॉक्टर मोजक्या कर्मचार्यांसह आरोग्यवर्धिनी केंद्राचा डोलारा सांभाळत आहेत. वैद्यकीय अधिकारी पदाचा प्रभार डॉक्टर नंदकिशोर चव्हाण यांच्याकडे असून त्यांच्याकडे अडगाव ची मुख्य जबाबदारी असल्याने ते हिवरखेड येथे वेळ देण्यास असमर्थ ठरतात.
अनेक वर्षांपासून पर्याप्त डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी असतानाही दोन दिवसात डॉक्टर उपलब्ध होईल चार दिवसात डॉक्टर उपलब्ध होईल. अशा आश्वासना खेरीज नागरिकांना काहीच मिळाले नाही.
दिनांक 16 जुलै रोजी रात्री हिवरखेड येथील एका गर्भवती महिलेला पोटात दुखू लागल्याने तात्काळ आरोग्यवर्धिनी केंद्रात नेण्यात आले. परंतु रात्रीच्यावेळी डॉक्टर हजर नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी ब्लड प्रेशर चेक करून त्यांना अन्यत्र रेफर केले. रेफर केल्यामुळे 108 रुग्णवाहिकेतून महिलेला अकोट येथे दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच अडगाव पूर्वी महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. त्यामुळे रुग्णवाहिकेला अडगाव आरोग्यवर्धिनी केंद्रात नेण्यात आले त्यावेळी तेथे सुद्धा डॉक्टर हजर नव्हते. या सर्व प्रकारामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी नवजात अकरा तासाच्या बाळाला घेऊन मातेसह नातेवाईकांनी हिवरखेड आरोग्यवर्धिनी केंद्रात येऊन आपला रोष व्यक्त केला आणि आपबिती कथन केली.
वेगळा बॉक्स करणे
आता तरी डॉक्टर द्या हो सरकार!
आज पर्यंत झाले ते झाले परंतु आता हिवरखेड आणि परिसरात कोरोना चे रुग्ण निघाले असून सरकारने आणि आरोग्य विभागाने येथील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हिवरखेड आरोग्यवर्धिनी केंद्रात पर्याप्त डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करावी. आणि अतिरिक्त 108 रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा येथील परिस्थिती कधीही चिघळू शकते हे मागील अनेक घटनांवरून निदर्शनास येते.
प्रतिक्रिया
आरोग्यवर्धिनी केंद्रात पुरेशे डॉक्टर व कर्मचारी नाहीत इतरही समस्या आहेत परंतु येथे स्वतःचा गाजावाजा करण्यासाठी अनेकांच्या नावाच्या बोर्डांची भरमार असून त्यांना नागरिकांच्या आरोग्याशी काहीच घेणे देणे दिसत नाही.
अमोल ढोले, रुग्णाचे नातेवाईक, हिवरखेड.