अकोला,दि.१७- महिला सुरक्षिततेसाठी अकोला जिल्ह्यात नवीन महिला मोटार कॅब (ऑटोरिक्षा) परवान्यांसाठी अर्ज स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली असून महिला परवानाधारकांच्या मालकीच्या ऑटोरिक्षा ह्या ‘अबोली’ रंगाने रंगवलेल्या असणे आवश्यक आहे,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांनी कळविले आहे.
यासंदर्भात प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अकोला यांनी दि.१४ रोजी झालेल्या बैठकीत ठराव करुन महिला परवानाधारकांच्या मालकीच्या मोटार कॅब अर्थात ऑटोरिक्षा वाहनास महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन नोंदणी करण्यास मंजूरी प्रदान केली आहे. त्यासाठी अटी शर्ती – अर्जदारास विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागेल. महिला परवानाधारकाच्या मालकीची प्रत्येक रिक्षा अबोली रंगाने रंगविण्यात आलेली असणे आवश्यक आहे. पोलिसांकडून मिळणारा चारित्र्य पडताळणीचा दाखला सादर करावा लागेल. अर्जदार सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्था, कंपनी अथवा अन्य कोणत्याही नोकरीत नसावी, तसेच स्वतःच्या नावे ऑटोरिक्षा , टॅक्सी परवाना नसल्याचे व मिटरप्रमाणे प्रवासी भाडे आकारण्याबाबत तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक न करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. अर्जदाराकडे अनुज्ञप्ती व सार्वजनिक सेवा वाहनाचा ऑटोरिक्षा बॅज असणे व स्थानिक रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्जदाराने आपला अर्ज www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर भरावा,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.