केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमन यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, ऊर्जा, कोळसा, खाण मंत्रालय तसेच अणु उर्जा विभागाचे सचिव आणि या मंत्रालयाशी संबंधित केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील 23 उद्यमांचे (सीपीएसई) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत बैठक घेतली. आर्थिक विकासाला गती प्रदान करण्यासाठी अर्थमंत्री विविध भागधारकांसोबत घेत असलेल्या बैठकीच्या शृंखलेचा एक भाग म्हणून ही बैठक आयोजित केली होती.
आथिर्क वर्ष 2019-20 मध्ये 23 सीपीएसईंसाठी 1,64,822 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या (सीएपीईएक्स) उद्दिष्टाच्या तुलनेत 1,66,029 कोटी रुपये म्हणजेच 101% भांडवली खर्च झाला. आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत 26,320 कोटी रुपये (16%) आणि आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत 20,202 कोटी रुपये (12%) भांडवली खर्च झाला. 2020-21 साठी 1,65,510 कोटी रुपये इतके भांडवली खर्चाचे लक्ष्य आहे.
सीपीएसईच्या कामगिरीचा आढावा घेताना अर्थमंत्री म्हणाल्या की भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्र उद्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. अर्थमंत्र्यांनी, सीपीएसईंना लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि वर्ष 2020-21 साठी त्यांना देण्यात आलेला भांडवली खर्च योग्य पद्धतीने आणि वेळेत खर्च होईल हे सुनिश्चित केले. अर्थमंत्री म्हणाल्या की सीपीएसईच्या चांगल्या कामगिरीमुळे कोविड-19 च्या प्रभावापासून अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल.
वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या तिमाही पर्यंतच्या भांडवलाच्या 50% पर्यंत भांडवली खर्च सुनिश्चित करून आणि त्यासाठी योजना तयार करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी सचिवांना सीपीएसईंच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की निराकरण न झालेल्या समस्यांचे त्वरीत निराकरण करण्यासाठी डीईए / डीपीईकडे वर्ग कराव्यात.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या मनुष्यबळ उपलब्धता, आयातीमधील उशीर, एनपीसीआयएल आणि एनएलसी सारख्या सीपीएसईच्या थकबाकीवर डिसकॉमने देय देण्यास केलेला उशीर यासारख्या समस्यांविषयी मंत्रालय / सीपीएसईंनी चर्चा केली. सीतारमन यांनी नमूद केले की असाधारण परिस्थिती हाताळण्यासाठी असाधारण प्रयत्नांची आवश्यकता असते आणि एकत्रित प्रयत्नांच्या सहाय्याने आपण केवळ चांगली कामगिरी करू शकत नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेलाही चांगले परिणाम साध्य करण्यासाठी मदत देखील करू शकतो.