वाडेगाव(डॉ चांद शेख)- तामसी येथील शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर तळपत्या उन्हात सौरऊर्जेचा वापर करीत खरबूज व टरबूजाची बाग फुलवुन ३ एकरात साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न घेत ऐन कोरोनाच्या संकटाच्या काळात आर्थिक प्रगती साधत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
बाळापूर तालुक्यात मन नदीपात्राला लागून तामशी हे गाव बसले आहे. येथील पुरुषोत्तम किसनराव लाहुडकार या शेतकऱ्यांनी दोन एकर खरबुज व एक एकर टरबूजाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. शेतीची मशागत करुन मल्चिंग पेपरचा वापर करीत लागवड केली. उत्पन्न सुरू होणार एवढ्यात कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण देश लाॅकडाऊन झाला. बाजारपेठ बंद असल्याने आता करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. परंतु लाहुडकार निराश झाले नाहीत.त्यांनी स्वतः खरबूज व टरबूजाची हात विक्री सुरू केली. ऐवढ्यात व्यापारी त्यांच्या शेतावर आले त्यानंतर त्यांनी शेतातूनच टरबूज व खरबूज विकण्यात यश आले. आतापर्यंत लाहुडकार यांनी तीन एकरात साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले असुन आपनाला अजुन एक लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा खरबूज व टरबूज उत्पन्नातून दिड लाख रुपये लागवडीचा खर्च निघाला शिवाय त्यांनी संकट काळात मोठा आर्थिक आधार मिळविला.