अमरावती, दि.१९- सामान्य नागरिकांनी राज्य माहिती आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वतः च्या ई-मेलद्वारे आयोगाचा ई-मेल आयडी [email protected] वर सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह २० रुपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी लावण्याची व्यवस्था केली आहे. परंतू आयोगाकडे असा पत्रव्यवहार करण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी न चुकता नमूद करावा, असे राज्य माहिती आयुक्त खंडपीठ अमरावती संभाजी सरकुंडे यांनी कळविले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊन जनजीवन ठप्प झाले आहे. अनेकविध आवश्यक वस्तूचे उत्पादन करणारे कारखाने, अनेकविध सरकारी कार्यालये, बँक, दळवळण ठप्प झाले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठ अमरावती हे कार्यालय देखील कोणत्याही काम करण्याविना बंद करण्यात आले आहे. अन्यथा दर महिन्याला या कार्यालयात केंद्रीय माहितीचा अधिकार आधीनियमांचे कलम १९(३) च्या तरतुदींनुसार ३५० चे आसपास व्दितीय अपील अर्ज व कलम १८ नुसार महितीसंबंधी तक्रारी दाखल होतात. ही आवक पोस्टाचे व्यवहार बंद असल्यामुळे थांबून गेली आहे. माहे मार्चपासून लॉक डाउन १,२,३ व आज दि.१८ मे पासून ४ था सुरू झाला आहे. तरी देखील यापुढे कार्यालय बंद असले वा ३३% मर्यादित उपस्थितीसह सुरू करण्यात आले असले तरी दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्यामुळे व तसेच ती वापरास निर्बंध असल्यामुळे नागरिकांना व्यक्तीशः माहिती आयोगाचे कार्यालयात येण्यासाठी दुरापास्त झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जरीही नागरिकांना आयोगाचे कार्यालयात व्यक्तिशः येणे शक्य होत नसले तरीही अप्रत्यक्षपणे अंतरावरून आयोगाचे कामकाज सुरू करण्यात आले असून मागील तीन वर्षांपासून आजमितीस आयोगाकडे प्राप्त होऊन नोंदविलेल्या ८००० व्दितीय अपील अर्जावर व १००० तक्रार अर्जावर सूनावण्या घेण्याचे कामकाज सुरू केले आहे. अंतरावरून अप्रत्यक्ष सुनावण्यांचे भाग म्हणून अपिलार्थी व तक्रादार यांचे अर्जावर संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांचे कार्यालयीन ई-मेल आयडी वर विस्तृत नोटीस पाठविण्यात येत असून सविस्तर खुलासे मागविण्यात येत आहेत. अपिलार्थी व तक्रारदार यांना सुनावणीच्या दृष्टीने संपर्क करण्यासाठी अर्जावर त्यांचे किमान मोबाइल क्रमांक देखील उपलब्ध नाहीत. ई-मेल आयडी तर नाहीतच नाहीत. यामुळे त्यांना संपर्क करण्यात मोठी अडचण होत आहे. तसेच सार्वजनिक प्राधिकरणावर बजावण्यात येत असलेल्या नोटिसमधून अपिलार्थी व तक्रारदार यांचे मोबाइल क्र.व असल्यास ई-मेल आयडी प्राप्त करून आयोगास पुरविण्याची देखील त्यांना विनंती करण्यात येत आहे. त्याशिवाय अपिलार्थी व तक्रारदार याना इ-मेलवर नोटीस देणे, गरजेनुरूप अप्रत्यक्ष सुनावणीचा भाग म्हणून त्यांना व्हाट्स अँप कॉल करून ऐकून घेणे, श्राव्य सुनावणीचा भाग म्हणून साधा कॉल करून ऐकून घेण्यासाठी मोठीच अडचण भासत आहे. म्हणून सर्व सार्वजनिक प्राधिकरणे व जनतेच्या सोयीसाठी कळविण्यात येत आहेकी सामान्य नागरिकांनी आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वतः च्या ई-मेलद्वारे आयोगाचा ई-मेल आयडी [email protected] वर सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह २० रुपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी लावण्याची व्यवस्था केली आहे. परन्तु आयोगाकडे असा पत्रव्यवहार करण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी न चुकता नमूद करावा असे राज्य माहिती आयुक्त खंडपीठ अमरावती संभाजी सरकुंडे यांनी कळविले आहे.