हिवरखेड (धीरज बजाज): अकोला जिल्ह्यातील वनी रंभापुर अकोट हिवरखेड वारखेड या रस्त्याकरिता 51 कोटीचा निधी अनेक वर्षांपासून मंजूर झालेला होता. सदर रस्त्याचे काम सुरुवातीला अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे हिवरखेड येथील रस्ताग्रस्त संघर्ष समितीने मोठे आंदोलन उभारले होते. त्यावेळी शांततामय आंदोलन करणाऱ्या नागरिकांना राजकीय दबावाखाली पोलिसांनी नोटीसा सुद्धा दिल्याची चर्चा होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 30 मार्च पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन लेखी स्वरूपात आंदोलकांना दिले होते. परंतु या रस्त्याचे काम कालावधी संपूनही अजून हिवरखेड पर्यंत सुद्धा पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरील धुळीमुळे प्रचंड हेलपाटे सोसावे लागत होते.
सदर रस्त्याचे काम सॉईल स्टेबिलाईझेशन टेक्नॉलॉजी या नवीन प्रणालीद्वारे मंजूर असल्याने त्यासाठी जागतिक दर्जाच्या विशेष मोठमोठ्या मशिनींद्वारे लॉक डाऊन सुरु होण्यापर्यंत काम सुरू होते. नंतर लॉकडाऊन मुळे रस्त्यांची कामे सुद्धा बंद पडली. त्यामुळे अकोट हिवरखेड रस्त्याच्या कंत्राटदाराने येथील जागतिक दर्जाच्या विशेष मशिनी थेट लेह लद्दाख (जम्मू काश्मीर) येथे रस्त्यांच्या कामासाठी पाठविण्याचा डाव रचला. ह्यासाठी हिवरखेड येथील अग्रसेन भवनच्या मागील प्लॉटमध्ये कोणाची नजर जाऊ नये म्हणून गुपचुप रीतीने दोन मोठ्या ट्रेलरमध्ये ह्या मशिनी चढवून रवानगीसाठी सज्ज झाले होते. ही बाब जेष्ठ पत्रकार गजानन दाभाडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाला माहिती दिली. त्यामुळे धिरज बजाज, राहुल गिर्हे, जितेश कारिया, ह्या जागरूक पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्ते अनिल कराळे, निलेश महाजन, पंकज इंगळे ह्यांनी दाभाडे यांचे सोबत घटनास्थळ गाठत चालकांना विचारणा केली असता लेह लद्दाखला रवानगी साठी परवानगीची प्रक्रिया सुद्धा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. कंत्राटदारांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली असता त्यांनी येथे रस्त्याच्या कामाला परवानगी नसल्याने मशिन लद्दाख ला पाठवीत असल्याचे सांगितले. त्यामुळे धिरज बजाज व दाभाडे यांनी अनेक वरिष्ठ लोकप्रतिनिधी, उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पीडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता सरनाईक, उपअभियंता बोचे, इत्यादींना याविषयी फोनवर आणि संदेशद्वारे अवगत करून ह्या मशीन लद्दाखला न पाठविता हिवरखेड येथीलच रस्त्याचे काम पूर्ववत सुरू करण्याची विनंती केली. त्यावर उपरोक्त सर्व मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद देत कंत्राटदाराला त्या मशिनी खाली उतरविण्याचे निर्देश दिले. सरनाईक साहेबांनी या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची ग्वाही दिली. आणि या मशिनी पळविण्याचा डाव योग्यवेळी निदर्शनास आणून दिल्याबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे आणि हिवरखेड येथील जागरुक नागरिकांचे कौतुक केले. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी या कोट्यवधी रुपयांच्या मार्गाचे काम पूर्ववत सुरू करण्यात आले.