ज्येष्ठ समाजसेविका आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे मंगळवारी म्हणजेच 28 एप्रिल रोजी निधन झाले आहे. त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अपर्णा रामतीर्थकर या चांगल्या वक्त्या होत्या आणि त्यांची मते त्या परखडपणे मांडत होत्या. या मतांमुळे काही वेळा वादही निर्माण झाला होता. ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या. सोलापुरातील पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. संस्कारभारतीच्या माध्यमातून त्यांनी सोलापुरात काम केले होते. बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या.
कुटुंब, संस्कार याबाबत त्यांनी राज्यात आणि देशात ठिकठिकाणी जाऊन त्यांची मते मांडली होती. अनेक जोडपी विभक्त होण्यापासून त्यांनी वाचवले होते. समुपदेशनातून त्यांनी दुभंगलेली मने जोडण्याचा प्रयत्न केला होता. आई-वडिलांनी मुलांवर संस्कार घडवावेत. संस्कार घडविण्यात आणि संस्कृती रक्षणात आईची भूमिका महत्वाची असते, असे मत अॅड. अपर्णा रामतीर्थकर या सातत्याने मांडत होत्या. एकत्र कुटुंबपद्धत ही संकल्पना ही हरवत चालली असून विभक्त कुटुंबपद्धत प्रचलित होत आहे. प्रत्येक कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा स्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या नात्याशी असलेली बांधिलकी कायम ठेऊन नाते संबंध मजबूत करा, नाते जपा, कुटुंब जपा असेही मत त्यांनी अनेकदा प्रगट केले होते.
मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत अपर्णा रामतीर्थकर यांनी फक्त घर सांभाळलं होतं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये त्यांन बी.ए.ची पदवी घेतली आणि नंतर एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणायला सुरुवात केली. या माध्यमातून त्या नकळतपणे हजारो घरांपर्यंत पोहोचल्या.
2001पासून त्या सामाजिक कार्यात असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांनी 2008पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत या भावनेने त्या कार्य करत होत्या. महिन्यातून 26 ते 28 दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्या अपर्णा रामतीर्थकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.