अकोला,दि.११ – कोरोना विषाणू संदर्भात चाचणी अंती निगेटिव्ह अहवाल आलेले परंतू वैद्यकीय निरीक्षणात व अलगीकरण करुन ठेवणे आवश्यक असलेल्या २७ जणांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात स्थलांतरीत करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात हे लोक आतापर्यंत निरीक्षणात होते. तेथून त्यांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. ही स्थलांतराची कारवाई प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार व तहसिलदार विजय लोखंडे यांनी पार पाडली. क्वारंटाईन वार्डात या व्यक्तिंना नाश्ता, चहा, जेवणाच्या व्यवस्थेसह एका कक्षात एक व्यक्ती याप्रमाणे राहण्याची सोय आहे. तसेच या कक्षासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.