अकोला- कोरोना या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. या संचार बंदी काळात कर्तव्यावर असणारे आणि या संकटामुळे अडचणीत आलेल्या साऱ्यांना अन्न देण्यासाठी विविध अन्नछत्र सुरु आहेत. या अन्नछत्रांना कारागृहात बंदीजनांनी परिश्रमाने पिकवलेला भाजीपाला देण्यात येत आहे. या व अशा विविध घटकांची सांगड घालून जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम परिपाठ घालून दिला आहे.
जिल्ह्यात सध्या २५ हून अधिक आश्रयगृहे तर तितकीच कम्युनिटी किचन्स सुरु आहेत. त्यांना दररोज किमान १५ ते २० हजार लोकांना अन्न द्यावे लागते. त्यासाठी भाजीपाला अन्न धान्य उपलब्ध करावे लागते. त्यासाठी महसूल विभाग, पुरवठा विभाग, कृषि विभाग असे विविध विभाग मिळून काम करीत असतात. याठिकाणी लागणारी भाजीपाल्याची गरज ओळखून कारागृह अधिक्षक ए.एस. सदाफुले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना विनंती केली व बंदीजनांनी पिकवलेला हा भाजीपाला शासकीय दराने कम्युनिटी किचनसाठी देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार हा भाजीपाला आता कम्युनिटी किचनला दिला जातोय.
अकोला कारागृहाकडे १४ एकर जमीन आहे. ही जमीन तीन विहीरींच्या पाण्यामुळे ओलिताखाली आहे. परिश्रम करणारे बंदीजन, व्यवस्थापन करणारा कारागृह कर्मचारी वृंद याबळावर इथं शेती पिकवली जाते. इथं गहू, सोयाबीन, तूर यासारखी धान्ये कडधान्ये, मोहरी सारखे गळीत धान्य, शिवाय बीट, नवलकोल, आंबटचुका, कढीपत्ता, कोथिंबीर, मुळा, कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, पत्ताकोबी, गोल भोपळा, दुधी भोपळा, पालक, वांगे, भेंडी, असा हरप्रकारचा भाजीपाला पिकवला जातो. याशिवाय इथं असलेले सहा बैल, सहा गायी, पाच वासरु यांना लागणारा चारा ही पिकवला जातो. शिवाय जनावरांचे शेणखत. त्यातून सेंद्रिय पद्धतीने हा सर्व भाजीपाला तयार केला जातोय. सध्या या तुरुंगात ४०२ कैदी आहेत.
या शेतीतून तुरुंग प्रशासनाने आतापर्यंत ७१ हजार ९०७ किलो उत्पन्न घेतले असून त्याचे रुपयातील मूल्य सात लाख २४ हजार ५४१ रुपये इतके आहे, हे मार्च अखेरचे उत्पादन आहे. हा भाजीपाला विक्री करतांना तो शासकीय दराने विकला जातो. हा दर बाजारभावापेक्षा निश्चितच स्वस्त असतो. कांदे आठ रुपये प्रतिकिलो आहेत तर कोथिंबीर २४ रुपये किलो, टोमॅटो ११ रुपये, फ्लॉवर १२, वांगे १७, पालक १०, आंबटचुका ९, मुळा १०, दुधी भोपला १२, नवलकोल १३, बीट १३ असे प्रतिकिलोचे दर आहेत.