अकोला : कोरोना जागतिक महामारीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देणाऱ्या अकोला जिल्हावासीयांनीमदतीचा ओघ सुरु केला आहे. आज अखेर जिल्ह्यातून प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी तीन लाख २३ हजार तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १५ लाख ७३ हजार रुपये इतका निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आला आहे.
या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यात प्रधानमंत्री सहाय्यता निधी साठी गुजराथी समाज अकोला यांनी एक लाख ११ हजार रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीने ११ लाख रुपये, सुमतिबाई अंधारे कृषि महाविद्यालय यांचेकडून दोन लाख रुपये, सालासार बालाजी सेवा समिती यांचेकडून एक लाख ११ हजार रुपये तर अकोला गुजराथी समाज यांचेकडून १ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. अन्य मदत देणाऱ्यांमध्ये कुणबी समाज मंडळाचे ५१ हजार रुपये, गोदावरी केडीया २१ हजा तसेच अन्य देणगीदारांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या मदतीचा धनादेश स्विकारला जातो, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.