हिवरखेड(धीरज बजाज)- संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे दहशत निर्माण झाली असून केंद्र सरकार, राज्य सरकार, यांनी अत्यंत कडक उपायोजना करत जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान केले आहेत, एकंदरीत आणीबाणी सदृष्य परिस्थिती या कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली आहे. एकीकडे संपूर्ण आरोग्य यंत्रणा ऍक्शन मोडवर असतानाही हिवरखेड आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र लावारीस अवस्थेत असल्याचे आमच्या आकस्मिक पाहणीत दिसून आले.
अनेक पदे मंजूर असणारा हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रावर पंचक्रोशीतील जवळपास पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्येचा भार आहे. परंतु येथे पाहणी केली असता वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स, परिचारिका, सफाईकामगार, औषध विभाग, इत्यादी कोणत्याही ठिकाणी कोणीही अधिकारी-कर्मचारी आढळून आले नाहीत. कोरोना संबंधी माहितीचा फक्त 1 छोटासा कागद भिंतीवर चिटकवलेला होता.
एवढेच नव्हे तर प्रसूती विभागात तीन महिला रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक महिला रामभरोसे होत्या त्यांच्याकडे लक्ष देणारेही कुणीच नव्हते.
सर्वात धक्कादायक खुलासा हा पाहायला मिळाला की रुग्णालयात भरती असलेल्या बाळांतीन महिलांना शासनामार्फत उच्च स्तराचा पोषण आहार दिला जातो तशा प्रकारचे मोठे फलक सुद्धा रूग्णालयात लागलेले असून त्याच्यात दूध, चहा, ब्रेड, उसळ चपाती, भाजी, इत्यादी अनेक प्रकारचे व्यंजन प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना मोफत दिले जात असल्याचा उल्लेख आहे परंतु भरती असलेल्या महिलांना पोषण आहारा बाबत विचारले असता त्यांनी रुग्णालयात कोणत्याही प्रकारचा पोषण आहार तर सोडा साधा चहासुद्धा मिळत नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आम्हालाच नव्हे तर आमच्या आधी सुद्धा कोणत्याही महिलांना आजपर्यंत पोषण आहार मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती सुद्धा त्यांनी दिली.
गरीब आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या या महिलांकरिता असणारा पोषण आहारात भ्रष्टाचार कोण करत आहे आणि पोषण आहार किंवा त्याचा पैसा कुठे जात आहे हा चौकशीचा विषय असून या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी होण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
मागील अनेक वर्षांपासून हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रचंड अधोगती झाली असून येथे पुरेशी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग नाहीत त्यातल्या त्यात अतिरिक्त 108 रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असताना जी आहे ती एकही रुग्णवाहिका पाहिजे त्यावेळेस उपलब्ध नसते त्यामुळे अनेक जणांना प्राणास मुकावे लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत तरी सुद्धा शासनाचे डोळे उघडत नसून येथे अतिरिक्त रुग्णवाहिका देण्यास कोणी उत्सुकता दाखविली नाही
लोकप्रतिनिधींकडून भ्रमनिरास
ह्या जिवघेण्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अनेक किस्से गाजलेले असून याची वाचा अनेक रुग्णांनी सर्वच स्तरातील विविध लोकप्रतिनिधींना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा साकडे घातले. परंतु येथील परिस्थिती काही सुधारली नाही.
प्रतिक्रिया
कोरोना संबंधित पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी 2 वाजता आरोग्यवर्धिनी केंद्रात आढावा बैठक घेण्यात येईल त्यासाठी सर्व जागरुक नागरिकांनी उपस्थित राहावे. सौ सुलभाताई दुतोंडे, जिल्हा परिषद सदस्य, हिवरखेड