अकोला (जिमाका) : इच्छाशक्ती, संकल्पशक्ती आणि तपस्या या गुणांमुळे स्वत:चे आणि देशाचे भवितव्य घडवता येते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा चौतिसवा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. आदित्य कुमार मिश्रा, कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आपल्या भाषणातून राज्यपालांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल अभिनंदन केले आणि भावी जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या. मानवी जीवनात इच्छाशक्ती, संकल्पनाशक्ती आणि इच्छीत ध्येय गाठण्यासाठी करावयाची साधना यांना मोठे महत्त्व आहे. या गुणांमुळे वैयक्तिक जीवनात यश संपादन करता येते आणि देशही सामर्थ्यशील ठरतो, असे ते म्हणाले.
देशाला उत्तम अभियंत्याप्रमाणेच शेतकऱ्यांची गरज असते. विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व अनेक गुणांना सामावून घेणारे असेल याची काळजी घ्यायला हवी, असे नमूद करून राज्यपालांनी विद्यापीठाच्या वाटचालीबद्दल सर्वांचे कौतूक केले.
दीक्षांत समारंभात कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी मराठीतून केलेल्या प्रास्ताविक भाषणाचा उल्लेख करून राज्यपाल म्हणाले, माता, मातृभाषा आणि मातृभूमी अशा श्रद्धास्थांनाना महत्त्व आहे. अन्य भाषा शिकल्या पाहिजेत, पण प्रत्येकाने त्याच्या मातृभाषेचे महत्त्व जाणले पाहिजे. यावेळी राज्यपालांनी पारंपरीक दीक्षांत उपदेश करून सर्वांना त्याचे पालन करण्यास सांगितले.
यावेळी दीक्षांत भाषणात डॉ. मिश्रा यांनी स्थानिक कृषी विषयक प्रश्न हे जागतिक स्तरावर महत्त्वाचे ठरत असतात आणि त्यांची उकल करण्यात कृषी विद्यापीठे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत, असे सांगितले. विदर्भातील सिंचन सुविधांचा शाश्वत विकास होणे आवश्यक आहे. असे सांगून त्यांनी नियमीत उत्पादनासाठी पशूपालन व्यवसायाचे महत्त्व अधोरेखीत केले. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकास या बाबींवर गुंतवणूक केल्यानंतर मिळणारा परतावा सर्वाधिक आहे, असे नमूद करून देशाने या क्षेत्रातील गुंतवणूकीत वाढ करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कृषी विद्यापीठांनी कापणी पश्चात तंत्रज्ञान, तसेच शेतमालाचे विपणन या बाबींवर लक्ष केंद्रीत करावे आणि ज्ञानावर आधारीत कौशल्यांचा विकास करून शेतीच्या उत्पादकतेत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ होऊ शकेल, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
शिक्षणामुळे सर्वांगीण परिवर्तन घडू शकते याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवून स्वत:वर विश्वास ठेवत आवडीचे क्षेत्र निवडावे, असे आवाहन त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या दीक्षांत समारंभात दोन हजार 640 विद्यार्थ्यांना पदवी, 378 विद्याथ्यांना पदव्युत्तर पदवी, 50 जणांना आचार्य पदवी प्रदान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 42 पदके आणि 32 रोख पारितोषिके देऊन गुणवंत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वाटचालीची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या समारंभात मान्यवरांच्या हस्ते आचार्य पदवी आणि पदके, पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. समारंभाच्या प्रारंभी सरस्वती वंदन सादर करणाऱ्या श्रद्धा वानखेडे यांचे राज्यपालांनी विशेष कौतूक केले.
या समारंभाला विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी उपस्थित होते.