तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा नगर पालिकेत सुरू भोंगळ कारभार हा खुद्द सत्ताधारी नगरसेवकांंकडून उघड होत असून न प चा कारभार कसा सुरू आहे याचे पुन्हा एकदा तेल्हारा वासीयांना समजले कारण नगराध्यक्ष याच्या नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या वागणुकीला कंटाळून नगर पालिकेच्या गटनेत्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून येत्या दोन दिवसात राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
नगर पालिकेचा कारभार बघता काही दिवसांपूर्वी सत्ताधारी नगरसेवक असलेल्या आरती गायकवाड यांनी पाण्यासाठी प्रशासन व नगराध्यक्ष यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. काही दिवस होत नाही तोच नगराध्यक्ष जयश्री पुंडकर हे नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देऊन एकाकीधिरपणा करून आपला कारभार चालवत आहेत. कामाबद्दल सहकारी नगरसेवकांना घेऊन भेटलो असता कुठलेही नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यात अयशस्वी ठरत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्याने जनमानसात नगरसेवकांची प्रतिमा मलिन होऊन पक्षाची सुद्धा प्रतिमा मलिन होत आहे. या सर्व बाबतीत वारंवार पक्ष श्रेठीकडे तक्रारी करून सुद्धा तक्रारीची दखल घेतली जात नाही असा आरोप सुद्धा पत्रकात करण्यात आला आहे. अपमानास्पद वागणूक व नागरिकांच्या समस्या सोडवण्यात नगराध्यक्ष यांच्या कडून येणाऱ्या अडचणीमुळे येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारी यांच्या कडे राजीनामा सोपवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गटनेत्यांच्या राजीनामा मुळे मात्र नगर पालिकेत खळबळ उडाली आहे. या बाबत पक्ष श्रेठी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.