अकोला(प्रतिनिधी)- सध्या अकोला शहरात वाहतुकीचे नियमन करणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे, शहरातील महत्वाच्या व राहदरीने नेहमी गजबजलेल्या रस्त्यांचे एकाच वेळेस सुरू असलेले बांधकाम, पर्यायी वळण मार्ग उपलब्ध नसणे, उपलब्ध असलेला मार्ग अरुंद व खड्डेमय असणे व ह्या सगळ्या भौगोलिक गोष्टींचा अभाव असतांना नागरिकां मध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्या विषयी असलेली उदासीनता व लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची वाढलेली भरमसाठ संख्या ह्या सगळ्या बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे अकोल्याची वाहतूक समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालली आहे, सध्या तयार होत असलेले चौपदरी रस्ते तयार झाल्या नंतर काही प्रमाणात दिलासा मिळेल, ह्याच आशेवर सामान्य अकोलेकर नागरिक सध्या जगतांना दिसतोय।
ह्या समस्येतून काही प्रमाणात दिलासा मिळावा म्हणून शहर वाहतूक विभागा तर्फे सोमवार दिनांक 11।11।19 पासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, त्या अंतर्गत वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून त्या शिवाय वाहतुकीची कोंडी टाळण्या साठी नागरिक व ऑटो चालक ह्यांचे सहकार्य आवश्यक असल्याने त्या साठी त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे, त्या अंतर्गत दिनांक 14।11।19 रोजी शहर वाहतूक शाखे मध्ये अकोला शहरात चालणाऱ्या ऑटो चालकांच्या प्रतिनिधींची सभा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी घेऊन त्यांना वाहतूक सुरळीत ठेवण्या साठी महत्वाच्या सूचना दिल्या, आज फक्त अकोला शहरातच 7500 ऑटो धावतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑटो रस्त्यावर धावत असल्याने ऑटो चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना दंडात्मक कार्यवाही ला सामोरे जावे लागेल असा कडक इशारा देऊन त्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले.
मागील 4 दिवसात 750 पेक्षा जास्त वाहनावर कारवाई करून दीड लाख रुपयां पेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला, परंतु फक्त वाहनावर कारवाई करून व दंड वसूल करून वाहतुकीची समस्या सुटणार नसल्याने प्रबोधन करणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले।