* ढोलताशांच्या गजरात रथामध्ये सर्व गावातून काढली स्वागत यात्रा
हिवरखेड (प्रतिनिधी)-“बेटी बचाव, बेटी पढाव” हा फक्त नारा नसावा तर प्रत्यक्ष कृतीतूनही मुलीच्या जन्माचा आनंद साजरा होणे आवश्यक आहे हा विचार मनात आला अन चौबे परिवारात तयारी सुरु झाली मुलीच्या आगळ्या वेगळ्या स्वागताची…
हिवरखेड येथील तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष नंदकिशोर चौबे यांचे सुपुत्र सूरज आणि स्नुषा प्रियंका यांना पहिली मुलगी झाली. मुलगी असते जिजाऊ सावित्री चे स्वरूप…तिच्या जन्माचे स्वागत करू खूप…. याला अनुसरून त्यांनी मुलीच्या घरी आगमनाच्या खुशीत ढोलताशांच्या गजरात सजविलेल्या रथातूनसंपूर्ण गावातून मुलीची व तिच्या आईची स्वागत यात्रा काढली. स्वागत यात्रेदरम्यान क्विंटलभराच्यावर मिष्टान्नाचे वितरण चौबे परिवारातर्फे करण्यात आले. संपूर्ण गावात या यात्रेच्या ठिकाणी स्वागत करण्यात आले व मुलीचे व तिच्या आईचे औक्षण करण्यात आले. स्वागत यात्रा नंतर चौबे परिवाराने घरी गावकरी आणि मित्र परीवारासाठी अल्पोपहाराचा कार्यक्रम सुद्धा ठेवला होता. विशेष म्हणजे परिवाराने कार्यक्रमादरम्यान आगंतुकांकडून कोणतीही भेट, बक्षीस, उपहार, इत्यादी स्विकारले नाही हे विशेष. चौबे परिवाराने मुलीच्या स्वागतार्थ केलेल्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.