अकोला (प्रतिनिधी)– जिल्हयातील पाणी टंचाई कार्यक्रमतंर्गत विविध उपाययोजनांची 437 प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामांपैकी 336 कामे पुर्ण झाली असुन उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहे. पाणी टंचाई निवारणाची कामे त्वरीत पुर्ण करावी असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास ,दुरसंचार , इलेक्ट्रानिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले.
जिल्हयातील पाणी टंचाई व दुष्काळ सदृश्य परिस्थीतीच्या अनुषंगाने आज दि. 06 जुन रोजी केद्रींय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये पाणी टंचाईच्या निवारणासाठी केलेल्या उपययोजनांच्या संदर्भात आढावा घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी आ. गोवर्धन शर्मा , आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिपंळे, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, नागपुरचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. धोत्रे पुढे म्हणाले की, योजनांची अंमलबजावणी करणारे अधिकारी व लाभार्थी यांच्या समन्वयाने प्रलंबीत असलेले प्रश्न तसेच समस्या निकाली निघण्यास वेळ लागत नाही. अधिकारी यांनी आपल्या कनिष्ठ अधिका-यांशी समन्वय साधून जनतेचे प्रश्न त्वरीत निकाली काढावे. शेतक-यांना धरणातून सिंचनासाठी पाणी देत असतांना पाणी वापर संस्था यांच्या समन्वयाने नियोजन करावे अशा सुचनाही त्यांनी दिल्यात.
नगरोत्थान योजनेतून महानगरपालीका यांच्याव्दारे करण्यात येणार असलेले वॉटर रिचार्ज शॉफ्टची कामे येत्या 15 जुन पर्यत भुजल संरक्षण विभागाने पुर्ण करावी असे निर्देश देवून पाणी पुरवठाच्या योजना पुर्ण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.ज्या गावाची मागणी असल्यास त्या गावात टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा अश्या सुचना त्यांनी दिल्यात.
उगवा ते घुसर या गावांपर्यंत पाईपलाईन नविन टाकण्यात आली आहे परंतू उगवा ते चौहट्टा बाजार या गावांपर्यंत पाईपलाईनमध्ये अनेक ठिकाणी लिकेजेस असल्यामुळे घुसर भागात पाणी पुरवठा व्यवस्थितरीत्या होत नसल्याची माहिती आ. रणधीर सावरकर यांनी सांगितली. त्यावर सदर अतिरीक्त पाईप लाईनसाठी निधी प्राप्त करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही श्री. धोत्रे यांनी दिली.
अकोला शहराला होणा-या महान धरणाचे चौथा व्हॉल नादुरूस्त असल्यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याची बाब महापौर अग्रवाल यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या निर्दशनात आणून दिली. तसेच 64 खेडी पाणी पुरवठा योजनेतील पंप जुने असल्यामुळे व्यवस्थीत पाणी पुरवठा होत नसल्याची बाब तसेच जांभळून पाणी पुरवठा योजना आदी बाबत आ. हरिष पिपंळे माहिती यांनी दिली. तेल्हारा व अकोट तालुक्यातील 191 खेडी पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. प्रकाश भारसाकळे यांनी केली. सर्वच आमदारांनी आपल्या मतदार संघात असलेल्या पाणी टंचाईबाबतची स्थिती केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या निर्दशनात आणून दिली. यावर परिस्थीतीचे गांभीर्य समजून अधिका-यांनी त्वरीत उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिलेत.
यावेळी मुर्तिजापूर शहरातील रस्त्यांचे चौपदरीकरण तसेच अकोट –अकोला महामार्गाची परिस्थीती याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला. पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती नागपूरचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायबोले यांनी दिली. यात सुकन्या समृध्दी योजना , पोस्टल लाईफ इन्सुरन्स अटल पेन्शन योजना , प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, इंडिया पोस्ट पेमेंट बँक , पोस्ट ऑफीस पास्टपोर्ट सेवा केंद्र तसेच आधारकेंद्र आदींचा समावेश होता.
पोस्ट कार्यालय हे एक महत्वाचे खाते असून नागरीकांनी तसेच शासकीय कार्यालयांनी या खात्यामार्फत आपले आर्थिक व्यवहार करावे यासाठी जनसामान्यांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार , अभयसिंग मोहिते पाटील, अनिल खंडागळे , जिल्हाअधिक्षक कृषि अधिकारी अरूण वाघमारे, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. कछोट , दुरसंचारचे महाव्यवस्थापक पवन बारापात्रे सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोट तालुक्यातील बोर्ड़ी येथे टँकरद्वारे पानीपुरवठा सुरु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola