अकोट(प्रतिनिधी) – मराठवाड्याप्रमाणे विदर्भालाही दुष्काळाचे चटके बसत अाहेत. सातपुडा डाेंगराच्या पायथ्याशी असलेला अकोट (जि. अकाेला) तालुकाही त्याला अपवाद नाही.या तालुक्यातील बोर्डी, रामपूर, शिनपूर, सुकडी या गावांची तहान टँकरद्वारे भागवली जाते. परंतु केवळ दीड हजार लोकवस्तीच्या बोर्डी येथील ग्रामस्थांनी गल्लोगल्ली सुमारे ५० बोअरवेल स्वखर्चाने खोदून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला अाहे. इथले लोक भूगर्भातील पाणी अक्षरशः ओरबाडून काढत आहेत. या पाण्याद्वारे गावकऱ्यांची तहान भागत असली तरी भविष्यात मोठे जलसंकट उभे राहू शकते. प्रशासनाने या गावात जलसाक्षरता मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे.
‘काॅटन सिटी’ म्हणून अकाेल्याची ओळख. इथले मुख्य पीक कापूस, सोयाबीन असले तरी सातपुडा पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये संत्रा पीकही घेतले जाते. अकोट तालुका हा तसाच. इथे कापसासोबत संत्रा बागाही अाहेत. या तालुक्यातील बोर्डी गावालाही टंचाईचे चटके माेठ्या प्रमाणावर बसत अाहेत. गावात जाताना रस्त्यात दिसणाऱ्या संत्र्यांच्या बागांबद्दल चौकशी केली. ‘पाणी बरे आहे का?’ तर या शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘यंदा पाणीच नाही, लई नुकसान आहे. संत्र्यांचा बहार आला असता, पण उन्हामुळे फळे गळू लागली आहेत. थोडे, थोडे पाणी देऊन झाडे जगवण्याचा प्रयत्न आहे. पण पाणीच नाही म्हटल्यावर आहे ती झाडे एक-एक मरू लागली आहेत,’ असे संजय नथ्थू हरमकार या तरुण शेतकऱ्याने सांगितले. हा शेतकरी सुकडी गावचा रहिवासी आहे. त्याच्या शेतात जाऊन पाहिले तर काही झाडे कोरडी होताना दिसली. तेथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोर्डी गावात गेलो. तेथे काही तरुण भेटले. त्यांनीही दुष्काळाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ‘टँकर सुरू झाले का?’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘कालच अधिकारी पाहणी करून गेले. करतील सुरू.’ ‘एवढ्या दिवसात तुम्ही टँकरची मागणी केली नाही का?’ असे विचारले असता ‘आम्ही आमची सोय करून घेतली,’ असे सांगत एक जण म्हणाला. प्रत्येक गावकऱ्याने पैसे दिले आणि सात ते आठ कुटुंबासाठी एक बोअरवेल केली. प्रत्येक गल्लीत दोन, तीन बोअर आहेत. यातून जो-तो आपले वीज कनेक्शन टाकून पाणी घेतो. हे ऐकून आधी बरे वाटले. नंतर विचारले पाणी किती फुटावर लागले असेल? तर म्हणाले, ‘५०० मीटरहून खोल आहे. थोडे, थोडे पाणी काढावे लागते.’ याचाच अर्थ भूगर्भातून ओरबाडून गावकरी पाणी काढतात. सातपुडा पायथा म्हटला म्हणजे जलपातळी खूप खोल नसणार, पण इथेही भूगर्भातही पाणी राहिले नाही. या एका छोट्याशा गावात विनापरवानगी ५० बोअरवेल केले. प्रशासनानेही या गावकऱ्यांना समजून सांगितले नाही.
प्रकाश वानखेडे नावाचा शेतकरी भेटला. त्यांची केळी आणि संत्र्याची बाग आहे. पिके वाचवण्यासाठी त्यांनी शेतात एक- दोन नाही तर तब्बल १० बोअर घेतले तरीही पाणी नाही. आता घड आलेली केळी उपटून फेकावी लागणार आहे. संत्रा बागेचेही तेच होणार. शेतात तर ६०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअर खोदले तरी पाणी नाही. यंदा समाधानकारक पाऊस झाला तरी जमिनीची तहान भागणार नाही. भूगर्भातील जलपातळी उंचावण्यासाठी आता इथल्या लोकांना सोबत घेऊन ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम हाती घ्यावी लागेल; अन्यथा पुढील वर्षी तर भूगर्भातील जलसाठाही संपेल, मग स्थलांतराशिवाय पर्याय उरणार नाही.
जलपुनर्भरण नाहीच
गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे येथे जल पुनर्भरण खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तथापि, प्रशासन किंवा सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून येथे काम करावे लागेल. प्रश्न पाणीटंचाईचा असल्यामुळे अधिकारी गावात येऊन गेले. त्यांनी जागोजागी टाकलेले बोअर पाहिले, पण हे निसर्गविरोधी आहे हे गावकऱ्यांना कुणीच बोलले नाही. पुढील वर्षी ही स्थिती नको म्हणून आतापासूनच येथे जलपुनर्भरणचा प्रयोग करावा लागणार आहे.’
फळांची बाग जळाल्याने थांबवले मुलीचे लग्न
शेतकरी संजय हरकमकर यांनी त्यांची सहा एकरातील संत्रा बाग दाखवली. दोन, तीन बोअर खाेदूनही पाणी नाही लागले. अखेर बाग सोडून दिली. पाच, सहा लाखांचे नुकसान झाले. अाधी या बागांवरच दोन मुलींचे लग्न केले. यंदा शेवटच्या मुलीचे लग्न करायचे होते, ते थांबवून घेतले. पण झाडे मेली तर सर्वच हातातून जाईल आणि पुढल्या वर्षीही मी काहीच करू शकणार नाही,’ असे त्यांनी सांगितले. या शेतकऱ्याची १०-१५ वर्षांपासून ही बाग होती. त्यामुळे संसारच मोडून पडेल की काय? अशी भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
अधिक वाचा : अकोट तालुक्यातील तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा करा – उपविभागीय अधिकारी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola