अकोला– जनसामान्यांच्या आरोग्यासाठी, रविवार, दि. 30 डिसेंबर 2018 रोजी अकोला शहरात महाआरोग्य अभियान रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. शिबीरासाठी आतापर्यंत 20 हजार लोकांनी नोंदणी केली आहे.
शास्त्री स्टेडीयम येथे सकाळी 9 वाजल्यापासून शिबीर सुरु होणार आहे. सर्वांसाठी विनामुल्य असणाऱ्या या शिबीरात तज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आजारांच्या तपासणीसह चाचण्या, औषध-उपचार आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यावतीने आयोजित महाआरोग्य अभियानाबाबत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
जिल्हयातील विविध विकास कामांचीही याप्रसंगी पालकमंत्री यांनी माहिती दिली. यावेळी माजी आमदार जगननाथ ढोणे, वसंतराव खोटरे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी सांगितले की, या अभियानात सरकारीसह विविध खाजगी रुग्णालयांच्या तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच शासकीय वैदयकीय महाविदयालयाचे विदयार्थी, विविध नर्सिंग कॉलेजचे विदयार्थी व विदयार्थीनी यांचासुध्दा अभियानात सहभाग राहणार आहे. एक्स रे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, विविध चाचण्यांसाठी पॅथोलॉजीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
एमआरआयसुध्दा काढुन दिला जाणार आहे. रुग्णांसाठी औषधीही उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. दुर्धर आजारांचे निदान झालेल्या रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयात उपचार उपलब्ध करुन दिली जातील. अभियानात विविध आजारांसाठी साधारण 30 बाहयरुग्ण स्टॉल राहणार आहेत. नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष राहणार आहे. सर्व प्रकारच्या तपासण्या अभियानात केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांकरीता गजानन महाराज संस्थानने जेवनाची व्यवस्था केली आहे.
दरम्यान, जिल्हयातील विकास कामांची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्हयातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लागली असून यामध्ये घुग्घंशी प्रकल्पाच्या पंपहाऊस, बंद पाईपलाईनचे डिझायन प्राप्त झाले आहे. तसेच नेरधामना, कवठा बॅरेज, अंधुरा बंधाराचे कामही पूर्ण लवकरच करण्यात येणार आहे. सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून यंत्रसामुग्री खरेदीची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्राचाही कायापालट करण्यात आला असून सर्व सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक भवनाचे काम पूर्णत्वास आले आहे. अतिरिक्त सुविधांसाठी 15 कोटी निधी प्राप्त झाला आहे.
जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतील फर्निचरसाठी साडेचार कोटीचा निधी मिळाला आहे. डाबकी रोड-शेगाव रेल्वे क्रॉसिंग उडडान पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. न्यु तापडिया येथील रेल्वे उडान पुलाच्या निविदाची प्रक्रीया पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम सात ते आठ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. शासकीय वैदयकीय महाविदयालयातील तीन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. अकोला तहसिल कार्यालय, तेल्हारा तहसिल कार्यालय, अकोट उपविभागीय व तहसिल कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरु झाले आहे. नेकलेस रोडचे काम मार्गी लागले असून याठिकाणी भूमिगत वीजवाहिनी केली जाणार आहे.
अकोला मनपा, मुर्तिजापूर न.प. बाळापूर न.प. ला अग्नीशमन वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुर्तिजापूर येथील अभ्यासिकेचे काम पूर्ण झाले असून अकोट व बाळापूर येथील काम सुरु आहे. अकोला येथील शासकीय विश्रामगृहाचे अदयावतीकरण करण्यात आले आहे. पासपोर्ट कार्यालयाचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण करण्यात येईल. रेल्वे स्टेशन परिसरात ॲटोरिक्शाची पार्किंग व्यवस्थित करणेबाबत व सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. सामाजिक न्याय भवन व पोलीस वसाहतीचेही काम मार्गी लागले आहे. पत्रकारांना खाजगी रुग्णालयांत सवलतीच्या दरात उपचार मिळावेत यासाठी त्यांना हेल्थ कार्ड देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : चित्रकला, रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना महापौरांच्या हस्ते पारितोषिक वितरण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola