अकोला (शब्बीर खान): देशभरात बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, व्यभिचार संपविण्यासाठी वेद व उपनिषदांच्या रामायण काळातील गुरुकुल पद्धतीचा ५०० आचार्य कुलम्मधून सुसंस्कारी, राष्ट्रभक्त, ऋषीतुल्य पिढी घडविण्याचे रामदेव बाबांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. भारतीय शिक्षा बोर्डाच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात साकारण्यात येणार असल्याची माहिती महिला पतंजली योग समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा साध्वी देवप्रिया यांनी स्वयंभूू शिवमंदिर संस्थान, अंत्री मलकापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महिला पतंजली योग समितीच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात २५ लाख महिला पतंजली योग समितीसोबत जुळल्या आहेत. ८० हजार महिला देशभरात योग प्रशिक्षणासह स्वदेशीचा प्रचार करीत आहेत. आज महिला सुरक्षित नाहीत, महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. हे रोखण्यासाठी सुसंस्कारित वेद उपनिषदांची शिक्षणप्रणाली आत्मसात केलेली राष्ट्रभक्त, ऋषीतुल्य पिढी निर्माण करण्यासाठी रामायण काळातील गुरुकुल शिक्षण प्रणालीची आज गरज आहे. स्वामी रामदेव बाबा यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, देशभरात प्रत्येक जिल्ह्यात १० एकरावर एक भव्य आचार्य कुलमची निर्मिती पतंजली योग समितीच्यावतीने करण्यात येणार आहे. सन २०२० पर्यंत १५०० एकरावर एक लाख मुले शिक्षण घेतील असे एज्युकेशन हब दिल्लीजवळ साकारत असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पतंजलीच्या महाराष्ट्र प्रभारी सुधाताई अलीमोरे, अरविंद देठे, शोभा भागिया, भारती शेंडे, राधेश्याम धूत आदी उपस्थित होते. महिला पतंजली योग समितीच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात २५ लाख महिला पतंजली योग समितीसोबत जुळल्या आहेत.