अकोला- भारतीय संस्कृतीत गाईला पवित्र मानले जाते. गाईचे दूध, गोमूत्र यामध्ये औषधी गुणधर्म असतात. याशिवाय गाईच्या शेणाचा खत म्हणून वापर केला जातो. गाईच्या या सर्व गुणधर्मामुळे तिचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी गाव तेथे गोशाळा (काऊ हॉस्टेल) हा उपक्रम राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प येथे राज्यस्तरीय गोवर्धन गोवंश सेवा केंद्राचे भूमिपूजन श्री. जानकर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त श्री. भोजने, संस्थेचे अध्यक्ष सुभाष जैन, रा.स्व. संघाचे गोसेवा प्रमुख अजित महापात्रा, ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, ॲड. मोतीसिंह मोहता, संस्थेचे संस्थापक रतनलाल खंडेलवाल, पशुसंवर्धन अधिकारी श्री. पारडे आदींची उपस्थिती होती.
आदर्श गोसेवा केंद्र ही उत्कृष्ट गोशाळा असल्याचे सांगून श्री. जानकर म्हणाले की, या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर एक गाईशी संबंधीत संशोधन केंद्राची निर्मिती केली जाईल. तसेच चारायुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येईल. चाऱ्यासाठी फीडमिल उभारण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्यात गाईंच्या आरोग्यासाठी मोबाईल व्हॅन सुरु करण्यात येईल. आपल्या देशात देशी गाईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गाईच्या शेणापासून तयार होणारे खत हे सेंद्रीय खत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे देशी गाईचे संवर्धन होणे आवश्यक आहे, यासाठी गाव तेथे काऊ हॉस्टेल (गोशाळा) हा उपक्रम राबविण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प येथे राज्यस्तरीय गोवर्धन गोवंश सेवा केंद्र उभारण्यासाठी शासनने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी अजित महापात्रा, ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, सुभाष जैन यांनीही मार्गदर्शन केले.
अधिक वाचा : भारनियमन त्वरित बंद करा; अन्यथा तिव्र आंदोलन करू प्रहारचा इशारा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola