अकोला : महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक हे स्पर्धा परिक्षांसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या मासिकाच्या नियमित वाचनामुळे यशाचा मार्ग निश्चितपणे सुकर होतो, असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक दत्ता ठाकरे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज जिल्हा ग्रंथालय कार्यालयात लोकराज्य वाचक अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, सहायक माहिती अधिकारी नितीनकुमार डोंगरे, जिल्हा ग्रंथालयाचे सहायक नवल कव्हळे, एलआयसी विकास अधिकारी रुपेश मांगुळकर आदींसह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले की, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वाचनाबरोबरच निरीक्षण व आकलन महत्त्वाचे आहे. कान व डोळयाच्या माध्यमातून सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करुन जीवनात यशस्वी होता येते. त्याचबरोबरीने वाचनही अत्यंत महत्त्वाचे आहे. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अधिकारी होणे ही जीवनातील एक मोठी संधी आहे. ही संधी प्राप्त करण्यासाठी लोकराज्य सारख्या मासिकाचे वाचन अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही अशा प्रकारच्या मासिकांचे वाचन केल्याने त्यांना त्यांच्या पाल्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती मिळेत.
लोकराज्य सारख्या मासिकातून तुम्हाला करियर करताना कोणत्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी कोणत्या सरकारी योजना आहेत. याची सर्व माहिती मिळू शकते. तसेच लोकराज्य मासिकाचे विविध विशेषांक हे वाचनीय व माहितीपूर्ण असतात, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वाचन करावे. या मासिकाचे वर्गणीदार होऊन नियमितपणे त्याचे वाचन करावे, असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी केले.
श्री. धोंगडे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी लोकराज्य मासिकाचे महत्व व उपयुक्तता पटवून दिली. वाचन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जीवनात यशस्वितेसाठी महत्त्वाची माहिती ही अवांतर वाचनातूनच मिळते. शिकूण मोठे होण्यासाठी, स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी एक चांगला मार्गदर्शक म्हणजे लोकराज्य मासिक आहे, असे ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे कॅमेरामन चंद्रकांत पाटील, मो. हबीब शेख अन्य कर्मचारी सतीश बगमारे, वर्षा मसने, किसन कडू, सुनील टोमे, प्रतिक वानखडे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमानिमित्त उभारण्यात आलेल्या लोकराज्य स्टॉलला मान्यवरांनी व मोठया संख्येने विदयार्थ्यांनी भेट देऊन मासिकाचे वर्गणीदार झाले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola