अकोला- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावर आणून पूरामध्ये फेकून देण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले असून, रात्री उशिरा वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान सदस्य ज्योती गणेशपुरे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच ज्योतीच्या बहिणीची मुले आणि तिच्या मुलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारेकऱ्यांनी आसिफ खान यांच्या हत्येची कबुली दिली असून, त्यांचा मृतदेह पूर्णा नदीच्या पुरात फेकून दिल्याचेही त्यांनी कबूल केले आहे; मात्र आसिफ खान यांचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नाही.
आसिफ खान यांना गुरुवारी 16 ऑगस्टला ज्योती गणेशपुरे यांचा फोन आला होता. तिने आसिफ खान यांना मूर्तिजापूर येथे तिच्या बहिणीकडे भेटायला बोलावले होते. तेव्हापासून आसिफ खान बेपत्ता होते, अशी तक्रार आसिफ खान यांचा मुलगा डॉ. सोहेल खान यांनी बाळापुर पोलिसात दिली होती. आसिफ खान यांचा शोध सुरू केला असता, त्यांची कार म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या काठावर चालू अवस्थेत दिसून आली होती. या कारमध्ये पोलिसांच्या हाती संशयास्पद पुरावे हाती लागले होते. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या पथकाने रविवारी ज्योती गणेशपुरे हिला मुंबईहून ताब्यात घेतले. तसेच मुर्तीजापुर येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आसिफ खान यांची हत्या झाल्याचे समोर आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी आसिफ खान यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह आणला व म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावरुन पुराच्या मध्यभागी फेकून दिला. रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आरोपीला घेऊन घटनास्थळावर गेले होते. ज्या ठिकाणी आसिफ खान यांचा मृतदेह नदीत फेकण्यात आला ती जागा आरोपींनी पोलिसांना दाखवली. खून करण्याची पद्धत, खून कोणी केला, विल्हेवाट कशी लावली, कोणत्या कारणासाठी आरोपीने टोकाचे पाऊल उचलले त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींची कसून चौकशी करीत असून लवकरच याचा उलगडा होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांनी दिली आहे.
प्रथमदर्शनी तपासामध्ये आसिफ खान यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे मारेकर्यांनी त्यांचा मृतदेह पूर्णेच्या पुरात फेकून दिला आहे. नदीकाठच्या नागरिकांना तसेच इतर कुणालाही मानवी मृतदेह आढळून आल्यास त्यासंबंधीची माहिती स्थानिक गुन्हे शाखा किंवा नजीकच्या पोलिसांना द्यावी.
– एम. राकेश कलासागर, पोलिस अधीक्षक
हेही वाचा : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या रौप्य महोत्सवी जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola