अकोला : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात आता औषधी व सुगंधी वनस्पतीचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून अनुदानासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी अनुदान
अभियानात अनुदानासाठी शेतकरी ज्येष्ठमध, मुलेठी, शतावरी, कलिहारी, सफेद मुसळी, गुग्गूळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा, पुष्करमूळ आदी औषधी वनस्पतींची लागवड करू शकतात. लागवडीचा मापदंड प्रतिहेक्टरी दीड लाख रू. आहे. सर्वसाधारण क्षेत्रासाठी 40 टक्के आणि अधिसूचित क्षेत्रांसाठी 50 टक्के अर्थसाह्य, लागवड साहित्य मिळते. जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान मंजूर होईल.
महाग सुगंधी वनस्पतीसाठी अनुदानाची तरतूद
गुलाब, रोझमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाईल, चंदन, दवणा, जाई, लॅव्हेंडर यासारख्या महागड्या सुगंधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी देखील अनुदान उपलब्ध आहे. प्रतिहेक्टरी 1 लाख 25 हजार रू. याप्रमाणे मापदंड असून, सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 40 टक्के, अधिसूचित क्षेत्रांसाठी 50 टक्के अर्थसहाय्य, लागवड साहित्य दोन हे. मर्यादेत देय आहे.
साध्या सुगंधी वनस्पतींसाठी मदत
पामरोसा, गवती चहा, व्हेटिव्हर, तुळस, जावा सिट्रेनेला, गोड तुळशीपत्र यासारख्या वनस्पतींसाठी लागवड खर्च 50 हजार रू. प्रति हेक्टर गृहित धरून सर्वसाधारण क्षेत्रात 40 टक्के व अधिसूचित क्षेत्रात 50 टक्के अर्थसाह्य दोन हे. मर्यादेत देय आहे. क्षेत्रविस्तारासाठी हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन घटकाखाली अर्ज करावेत. योजनेचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.