हिवरखेड(धीरज बजाज)- अकोट हिवरखेड जळगाव राज्य महामार्गावरिल खंडाळा येथील पुलाचे बांधकाम कालावधी पूर्ण होऊनही कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडल्याने तसेच तयार केलेला पर्यायी पुलाचा भराव वाहून गेल्याने शनिवार रात्रीपासून हा महामार्ग बंद पडला आहे.
सविस्तर असे की अकोट हिवरखेड जळगाव हा राज्यमार्ग पीडब्ल्यूडी अंतर्गत होता. परंतु कालांतराने हा महामार्ग MSRTDC एम एस आर टी डी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडे सुपूर्द करण्यात आला होता त्यांच्याकडून या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुद्धा सुरू आहे. परंतु या रस्त्यावरील अनेक पुलांचे काम पीडब्ल्यूडी अंतर्गत आधीच कंत्राट दिले असल्याने PWD पीडब्ल्यूडी अंतर्गत पुलाचे काम सुरू आहे. सदर काम कालावधी पूर्ण होऊनही अनेक महिन्यापर्यंत रेंगाळलेले असल्याने हजारो प्रवाशांना नरक यातना सोसाव्या लागत आहेत. पुलाचे बांधकाम कालावधी पूर्ण होऊनही कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडल्याने तसेच जमुना नदीला पूर आल्याने तयार केलेला पर्यायी पुलाचा भराव वाहून गेल्याने शनिवार रात्रीपासून हा महामार्ग बंद पडला आहे.
युवकाचा गेला हकनाक बळी
पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने रात्रीच्या वेळी त्यामध्ये पडून काही महिन्यांपूर्वी एका तरुण निरपराध युवकाचा बळी गेला आहे. त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा कंत्राटदाराकडून अथवा शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. मृतकाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई न देता अथवा कोणत्याही प्रकारची मदत न करता सदर प्रकरण कुठे दबले याबाबत सुद्धा शंका उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे कंत्राटदारांची बिले वेळेवर अदा करण्यात शासन अपयशी ठरल्याने पुलाचे काम करण्यात उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु मुदतीत काम न केल्यावरही कंत्राट दारावर आतापर्यंत काळ्या यादीत टाकण्याची अथवा कोणतीही दंडात्मक कारवाई झाल्याचे ऐकण्यात आले नाही. दंडात्मक कारवाई न करता उलट कंत्राटदाराला मुदत वाढ देण्यात आली. सदर कंत्राटदारांवर पीडब्ल्यूडी च्या विशेष मेहरबानीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. वृत्त लिहीपर्यंत या मार्गावर जड वाहतूक सुरू होऊ शकली नव्हती. हिवरखेड अकोट राज्य मार्गावरील दोन पुलाचे काम राजेश देशमुख आणि नागपूर येथील हॅम च्या कंत्राटदाराला संयुक्तपणे दिलेले आहे. त्यांनी मुदतीत काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. धनंजय बरडे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा.
हिवरखेड, सोनाळा, जळगाव परिसरात हजारो हेक्टर वर केळीची लागवड असल्यामुळे दररोज शेकडो ट्रक केळी पिकाची कटिंग होत असून सदर ट्रक छत्तीसगड मध्यप्रदेश सह इतर राज्यात पाठवल्या जातात. परंतु शनिवार रात्री पासून महामार्ग बंद असल्याने केळी वाहतूक थांबल्याने शेतकऱ्यांची केळी पाठविणे थांबले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ज्या कंत्राटदारांना मुदतीच्या आत पुलांची कामे करता येत नाहीत अशा कंत्राटदारांना कंत्राट देऊन जनतेचे नुकसान का केल्या गेले? यासाठी संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कार्यवाही करावी. दोन्ही पुलांचे काम लवकर पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांद्वारे मोठे आंदोलन उभारण्यात येईल…. मधुकर पोके, उमेश फोपसे केळी सप्लायर हिवरखेड.
अकोट हिवरखेड जळगाव महामार्गा वरिल पर्यायी पूल वाहून गेल्याने हा महामार्ग बंद व्हायला तिसरा दिवस उजाडला. तरीही संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या मार्गांवर शिक्षण घेण्यासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे रस्ता त्वरित सुरू करण्यात यावा. तुळशीदास खिरोडकार, शिक्षक.