नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांचे प्रबोधन केले. समाज परिवर्तन केले. राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी राष्ट्रभक्ती रुजवण्याचे काम केले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले. त्याचवेळी महाराजांचे विचार सर्वव्यापी करण्यासाठी, नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विदर्भास्तरीय खंजारी भजन स्पर्धेचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. यावेळी श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर प.पू. जितेंद्रनाथ महाराज, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री. जनार्दनपंत बोथे गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत काळमेघ, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अशोक यावले, संताजी सभागृहाचे अध्यक्ष नानाभाऊ ढगे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
भजने मनोरंजनासाठी नाहीत, समाजावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आहेत. महाराजांच्या भजनांमध्ये हा भाव आपल्याला बघायला मिळतो, याचाही ना. श्री. गडकरी यांनी उल्लेख केला. ग्रामविकास ही ग्रामगीतेची संकल्पना आहे. ग्रामीण भागाचा विकास कसा व्हायला हवा, आदर्श गाव कसे असावे हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितले. पण हा विचार शब्दांपुरता मर्यादित न राहता आपल्याला कृतीमध्ये उतरवावा लागेल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. महाराजांनी त्यांच्या जीवनात कृषी विकास, स्वच्छता आदींचा विचार पोहोचवला. त्यांच्या गीतांनी, भाजनांनी आपण भारतीय आहोत, ही भावना रुजविण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवात 4000 गुरुदेव भक्तांनी भजन गावे अशी इच्छा ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रसंतांचे विद्यापीठ गीत 50 हजार विद्यार्थ्यांनी एकावेळी गावे आणि विश्वविक्रम करावा, अशी इच्छा असल्याचेही ते म्हणाले. समाजपरिवर्तनाचे प्रक्रिया गतिशील करण्यासाठी राष्ट्रसंतांच्या विचारांचा अधिक प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे ना. श्री. गडकरी म्हणाले. प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले. तर आभार डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी मानले. श्याम देशपांडे, देवेंद्र यादव, स्नेहल पाळवीकर, विजयराव बोरीकर, उमेश बारापात्रे, फाल्गुन खुर्जेकर, शुभांगी नाफड, रश्मी किन्हीकर, वैकुंठ उज्जैनकर, कृष्णा डोमके यांनी तीन दिवस झालेल्या स्पर्धेचे परीक्षण केले. ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
भजन हे आत्म्याचे भोजन व्हावे – जनार्दनपंत बोथे गुरुजी
‘तुकडोजी महाराज बरेचदा रेल्वेच्या प्रवासात भजन लिहायचे. महाराजांनी भजनांचे वैभव आपल्याला दिले. भजन हे खऱ्या अर्थाने आत्म्याचे भोजन व्हायला पाहिजे. म्हणूनच साधू संतांनी हे साहित्य लिहून ठेवले आहे,’ असे जनार्दनपंत बोथे गुरुजी म्हणाले.
गुरुदेवांसारखे संत लाभले हे विदर्भाचे भाग्य – प.पू. जितेंद्रनाथ महाराज
भजने पौरुष, आदर्श, प्रेरणा निर्माण करण्याचे काम करतात. या भजनांच्या माध्यमातून मनाच्या, भावनांच्या लहरी कशा असाव्यात हे राष्ट्र संतांनी लिहून ठेवले. भारत एक मंदिर आहे असं महाराजांनी म्हटलं आहे. त्यामुळे गुरुदेवांसारखे संत लाभले हे विदर्भाचे भाग्य आहे, असे श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर प.पू. जितेंद्रनाथ महाराज म्हणाले. गडकरी हे गुरुदेवांचे प्रचारक म्हणून खऱ्या अर्थाने देशाची सेवा करीत आहेत. त्यांना गुरूदेवांचा आशीर्वाद आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
स्पर्धेचा निकाल
- प्रथम क्रमांक – स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरी (1 लाख रुपये)
- दुसरा क्रमांक – आदर्श गुरुदेव सेवा मंडळ निमगव्हाण चांदूर रेल्वे (71 हजार रुपये)
- तिसरा क्रमांक – सार्थक गुरुदेव सेवा मंडळ हस्तापूर बाभुळगाव ( 51 हजार रुपये)
- चौथा क्रमांक – गुरुदेव मानवसेवा छात्रालय भजन मंडळ, मोझरी (41 हजार रुपये)
- पाचवा क्रमांक – अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ हिरापूर बोथली चंद्रपूर (31 हजार रुपये)
- सहावा क्रमांक – जय वळेकर माऊली भजन मंडळ खामगाव (21 हजार रुपये)
- सातवा क्रमांक – गुरुमाऊली भजन मंडळ साहूर आष्टी (11 हजार रुपये)
उत्तेजनार्थ पुरस्कार
गोपाल प्रासादिक मंडळ साकोली, नक्षत्र कला मंदिर नागपूर, गुरुमाऊली भजन मंडळ नागपूर, गुरुदेव भजन मंडळ नागपूर, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गिरड, रत्नाक्षी भजन मंडळ नागपूर, नवयुवक भजन मंडळ कळमेश्वर, गुरुदेव सेवा भजन मंडळ जयताळा नागपूर, गुरुदेव सेवा प्रार्थना मंडळ नवे बीडीपेठ नागपूर, गुरुदेव सेवा भजन मंडळ अर्जुनी मोरगाव, गुरुदेव बाल सेवा मंडळ समुद्रपूर गिरड, ग्रामनाथ सेवा भजन मंडळ राळेगाव, जय बजरंग गुरुदेव भजन मंडळ दहेगाव रंगारी आणि साईकृपा भजन मंडळ म्हाळगी नगर नागपूर यांना 5 हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
271 मंडळांनी केला राष्ट्रसंतांच्या भजनांचा जागर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांवर आधारीत विदर्भस्तरीय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये सलग दोन दिवस 271 भजन मंडळानी सहभाग नोंदवला. त्यातील 21 मंडळांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपरिक चालींवर आधारित प्रबोधनात्मक व राष्ट्रभक्तीवर आधारित विषयांवरची भजनं यावेळी मंडळांनी सादर केली. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्याबाहेरील सहभागी मंडळांना 4000 रुपये व नागपूर शहरातील सहभागी मंडळांना 2000 रुपये मानधन देण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक व अशोक यावले, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता, उपाध्यक्ष गौरीशंकर पाराशर व माजी आमदार अशोक मानकर, कोषाध्यक्ष राजेश बागडी, बाळासाहेब कुळकर्णी, दीपक खिरवडकर, अविनाश घुशे, विजय फडणवीस, राजेश कुंभलकर, मनिषा काशीकर, किशोर पाटील, भोलानाथ सहारे, श्रीरंग वराडपांडे, दिलीप जाधव, शशांक खेकरे आदी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.