ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरसचे (HMPV) भारतात तीन रूग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये या विषाणूचा प्रसार लहान मुले आणि वृद्धांमध्ये याचा वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जगभरात HMPV या विषाणूच्या प्रसारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
‘HMPV’ संक्रमण बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या :
‘HMPV’ चा संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये खोकला आणि ताप यासारख्या लक्षणांसह वरच्या श्वसनमार्गाचे संक्रमण होते. ते श्वसनमार्गाच्या थेंबांद्वारे पसरते. या संसर्गावर सध्या कोणतीही लस नाही. संसर्ग कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि स्वच्छता पद्धतीचा अवलंब करणे हे एकमेव उपाय आहेत.
कर्नाटक, गुजरातमध्ये आढळले ‘HMPV’ रुग्ण :
मानवी मेटाप्युमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही विषाणू जगभरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या विषाणूमुळे अनेक देश त्याच्या प्रसारावर लक्ष ठेवून आहेत. जगासोबत भारतानेही यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. भारतात आतापर्यंत बंगळूरमध्ये दाेन तर अहमदाबादमध्ये एक रुग्ण अआढळला आहे. बंगळुरूमध्ये आठ महिन्यांचा मुलगा आणि तीन महिन्यांच्या मुलीची विषाणूची चाचणी सकारात्मक झाली आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नव्हता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चीनमध्ये ‘या’ वयोगटात ‘HMPV’ चा सर्वाधिक प्रसार :
आरोग्य तज्ञांनी एचएमपीव्ही या श्वसन विषाणूवर चिंता व्यक्त केली आहे. अलीकडे आढळलेल्या प्रकरणांमध्ये rhinovirus आणि human metapneumovirus सारख्या रोगजनकांचा समावेश आहे. चीनच्या उत्तरेकडील प्रांतांमध्ये विशेषतः 14 वर्षाखालील लहान मुलांमध्ये मानवी मेटाप्युमोव्हायरसच्या प्रकरणांमध्ये प्रसार दिसून येत आहे.
HMPV विषाणू काय आहे ?
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, 2001 मध्ये मानवी मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) शोधला गेला. हा एचएमपीव्ही न्यूमोव्हिरिडे कुटुंबाशी संबंधित आहे, जे रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस (RSV) सारखेच आहे. सहसा वरच्या आणि खालच्या श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरते. याची सामान्य लक्षणेही सर्दी किंवा फ्लू सारखीच असतात. तज्ज्ञांच्या मते काही सेरोलॉजिकल पुराव्यानुसार हा विषाणू जगात 1958 पासूनच पसरत आहे. सीडीसीच्या मते, याचा सर्व वयोगटातील लोकांवर परिणाम होऊ शकतो, लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो.
HMPV कसा पसरतो ?
CDC नुसार, HMPV विषाणू खोकणे किंवा शिंकणे, हात हलवणे, एखाद्याला स्पर्श करणे, जवळच्या संपर्कात येणे, दूषित पृष्ठभागांना स्पर्श करणे किंवा तोंड, नाक किंवा डोळ्यांना स्पर्श करणे अशा थेंबांद्वारे पसरतो.
काय आहेत ‘HMPV’ची लक्षणे ?
CDC नुसार, मानवी मेटाप्युमोव्हायरसचे (HMPV) संक्रमण झालेल्या रूग्णामध्ये खोकला, सतत वाहणारे नाक, ताप, घसा खवखवणे, घशाची जळजळ होणे, तर काही प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे ही सामान्य लक्षणे आहेत. तर काही प्रकरणांमध्ये या विषाणूच्या संसर्गामुळे ब्राँकायटिस, न्यूमोनिया किंवा दम्याची लक्षणे देखील दिसून येतात.
या विषाणूचा सर्वाधिक धोका कोणाला?
चीनमध्ये सर्वाधिक संक्रमण 14 वर्षाखालील मुलांमध्ये झाले आहे, अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्या तीव्र लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल केले जात आहे. मॅक्स हेल्थकेअरच्या मते, 5 वर्षांखालील मुले, लहान मुले, वृद्ध आणि विशेषत: 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक, दमा किंवा सीओपीडी सारख्या श्वसनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींना मानवी मेटाप्युमोव्हायरस (HMPV) संक्रमणाचा सर्वाधिका धोका असल्याचे म्हटले जात आहे. गर्भधारणेदरम्यान, HMPV मुळे श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
काय घ्याल काळजी : –
HMPV ला प्रतिबंध करण्यासाठी सध्या कोणतीही विशिष्ट लस उपलब्ध नाही, त्यामुळे HMPV संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी या उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.
- साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवा.
- साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास, अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरा.
- श्वसनाच्या आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
- दरवाजाची हँडल, फोन आणि काउंटरटॉप्स यांसारख्या वारंवार स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची साफसफाई करत रहा.
- मास्क घातल्याने श्वासोच्छवासातील आजारांचा संसर्ग कमी होण्यास मदत होते.
- तुम्हाला ‘अशी’ काही लक्षणे आढळल्यास, तपासणी करा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.