स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्लर्क भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. एकूण 13 हजार 735 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्युनियर असोसिएट (ग्राहक सहाय्य आणि विक्री) या लिपिक संवर्ग पदासाठी इच्छुक उमेदवारांना 17 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. याबाबत उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अधिक माहिती मिळू शकते.
पात्रता निकष
ज्युनियर असोसिएट पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे. इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD) असणाऱ्या उमेदवारांनी त्यांची पदवी 31 डिसेंबर 2024 पूर्वी पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
अर्जदाराचे वय 1 एप्रिल 2024 पर्यंत 20 ते 28 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1996 ते 1 एप्रिल 2004 या दरम्यान झालेला असावा.
अर्ज असा करा
- SBI क्लर्क 2024 भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रकिया करा
- SBI च्या अधिकृत करिअर पेजवर जा : sbi.co.in/careers
- “Latest Announcements” किंवा “Recruitment of Junior Associates (Clerk)” अधिसूचना शोधा.
- ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.
- नवीन वापरकर्त्यांनी ‘New Registration’ निवडून नाव, फोन नंबर आणि ईमेल ID यासारखी मूलभूत माहिती भरा.
- अर्ज फॉर्म पूर्ण करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे अर्ज शुल्क भरा.
- सर्व तपशील काळजीपूर्वक तपासून ‘Final Submit’ वर क्लिक करा.
- भविष्यकालीन संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा.
निवड प्रक्रिया
निवडीसाठी ऑनलाइन प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा तसेच निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल. प्राथमिक परीक्षा 100 गुणांची असून ती 1 तासाच्या कालावधीसाठी असणार आहे आणि ती वस्तुनिष्ठ प्रकारची असेल.
- प्राथमिक परीक्षा : अंदाजे फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.
- मुख्य परीक्षा : अंदाजे मार्च/एप्रिल 2025 मध्ये आयोजित केली जाणार आहे.
पगार श्रेणी
लिपिक संवर्गासाठी वेतन श्रेणी रु. 24,050 ते रु. 61,480 पर्यंत आहे. पदवीधर उमेदवारांसाठी प्रारंभिक मूळ वेतन रु. 26,730 असून यामध्ये रु. 24,050 आणि दोन पुढील अग्रिम वाढींचा समावेश आहे. उमेदवार अधिक तपशीलांसाठी SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.