नागपूर : एकीकडे मुंबईत होणाऱ्या भाजपच्या विधिमंडळ गटनेते बैठकीकडे, राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना आणि नागपुरात विशेष विमान, रेल्वे आणि खाजगी वाहन आणि हजारो लोक मुंबईकडे निघाले असताना आज सर्वांचे लक्ष आपल्या घराकडे केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले. नागपुरात आज (दि.४) सकाळी -सकाळी काही काळासाठी भूकंपाचे धक्के जाणवले.
अर्थातच हे धक्के तेलंगणा मधील भूकंपाशी संबधित असल्याचे उघड झाले. नागपुरातील बेसा, हुडकेशवर, मनीष नगर, हनुमान नगर, काटोल रोड, गोधनी, पायोनियर कॉलनी अशा विविध भागातून आता सकाळच्या वेळी काही क्षणांसाठी धक्के जाणवल्याची माहिती पुढे येत आहे. ती सोशल मीडियावर शेअर होत आहे. मात्र, कुठेही काही नुकसान नाही. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातही सौम्य धक्के जाणवले आहेत. घाबरू नये, नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.