अकोला,दि.२: सांस्कृतिक कार्य विभागामार्फत समाजकल्याण अधिकारी कार्यालयामार्फत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजना राबवली जाते. या योजनेमार्फत कला क्षेत्रात काम करणा-या ढोल वादक, मृदंग वादक, संगीत, गायक, हार्मोनियम, चित्रकार, भजन, किर्तन, समाज प्रबोधन आदी कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना शासनाकडुन मानधन दिले जाते. मानधनात एप्रिल २०२४ पासुन पाच हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे. जिल्हयात कलाकारांची संख्या ७७८ आहे. त्यापैकी ६२९ वृद्ध साहित्यिक कलावंतांचे आधार पडताळणी झालेली आहे. उर्वरीत १५० कलाकारांचे पडताळणी बाकी आहे. जिल्हयातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी आपले आधार पडताळणी पंचायत समिती स्तरावर करणे आवश्यक आहे. आधार पडताळणी न केल्यास मानधन बंद होईल. मयत कलाकारांचे प्रस्ताव त्यांच्या वारसदारांनी तात्काळ समाज कल्याण विभाग जि. प. कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एच.जे.परिहार यांनी केले आहे.