अकोला, दि. 4 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व व्यापक जनजागृतीसाठी मतदान केंद्रांच्या क्षेत्रात घरोघर भेटी द्याव्यात, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृती कार्यक्रमांचा आढावा त्यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट सदस्य, सहकारी संस्थांचे कर्मचारी, प्रतिनिधी यांचे गट करून घरोघरी भेटी द्याव्यात. प्रत्येक गटाला भेट द्यावयाचे क्षेत्र व एकूण घरांची संख्या निश्चित करून द्यावी. त्यानुसार अचूक कार्यक्रम राबवावा. एकही घर सुटता कामा नये. लोकसभा निवडणुकीत 50 टक्क्यांहून कमी मतदान झालेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून प्राधान्याने प्रभावी जनजागृती करावी. मतदार ओळखपत्र नसेल तर पर्यायी ओळखपत्रांची, तसेच आयोगाने दिलेल्या विविध सुविधांची माहिती द्यावी. मतदारांना विशेषत: नवमतदारांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी दिले.