केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मंगळवारी (दि.१५) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, असे आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
असा आहे महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम
महाराष्ट्रातील निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी जारी होईल. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबर ही अखेरची तारीख असेल. तर २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले.
राज्यात ९.६३ कोटी मतदार
महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार आहेत. यात ४.९७ कोटी पुरुष मतदार आहेत. तर ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. महाराष्ट्रात २० ते २० वयोगटातील तरुण मतदारांची संख्या १.८५ कोटी आहे. तर राज्यात १८ ते १९ वयोगटातील २०.९३ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली.
आगामी दिवाळी (२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर), छट पूजा आणि देव दिवाळी हे सण लक्षात घेता निवडणूक आयोगाने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदानाची तारीख निवडली आहे. दसऱ्यानंतर आचारसंहिता, दिवाळीनंतर मतदान असे संकेत याआधीच निवडणूक आयोगाने दिले होते.
यंदा २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान दिवाळी साजरी होणार असून, १५ नोव्हेंबर रोजी देव दिवाळी आहे. छट महोत्सव ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान आहे. हिंदीपट्ट्यात देव दिवाळी आणि छट महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या सणांसाठी गावाकडे जाण्यास मतदार प्राधान्य देतात. हे मतदार आपल्या गावी जाऊन परतण्याचा कालावधी लक्षात घेऊन निवडणुकीची तारीख ठरविण्यात आली आहे.
प्रचाराला अतिशय कमी कालावधी मिळणार
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल २६ नोंव्हेबरला संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. २८ नोव्हेंबर पूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. यामुळे लोकसभा निवडणुकीसारखाच विधानसभेला अतिशय कमी कालावधी प्रचाराला मिळणार आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीत उमेदवार जाहीर करण्यात कोण आघाडी घेणार? यावर बराच खेळ अवलंबून असणार आहे.
याआधीची निवडणूक प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये झाली होती
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १२ सप्टेंबर २०१४ रोजी झाली. मतदान १५ ऑक्टोबरला झाले. मतमोजणी १८ ऑक्टोबरला झाली होती. तर २०१९च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा २० सप्टेंबरला झाली होती. २१ ऑक्टोबरला मतदान आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने २१ सप्टेंबर २०१९ रोजी पत्रकार परिषद घेऊन केली होती. मतदान हे बरोबर एक महिन्याने म्हणजे २१ ऑक्टोबरला, तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती.
हरियाणा, जम्मू-काश्मीरमधील मतदारांचे मानले आभार
हरियाणा आणि जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीत लोकांनी ज्याप्रकारे सहभाग दर्शविला त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन्ही राज्यातील जनतेचे आभार मानले. दोन्ही राज्यात कुठेही हिंसाचार झाला नाही. शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले.