हिवरखेड(प्रतिनिधी)- आगामी दिवसात महत्वपूर्ण सण – उत्सवांचा भरगच्च कार्यक्रम असून त्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) बच्चन सिंग तसेच अकोट पोलीस उपविभागीय अधिकारी (DYSP) अनमोल मित्तल यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे भेट देऊन महत्त्वपूर्ण विषयांवर संबंधितांशी चर्चा केली. पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी हिवरखेड येथे आले असता हिवरखेड चे ठाणेदार श्री. गजाननजी राठोड, संपूर्ण पोलीस स्टाफ, अनेक पोलीस पाटील, अनेक शांतता समिती सदस्य, पत्रकार बांधव व व्यापारी बांधवांसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील गणमान्य मंडळी उपस्थित होते. सर्वांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा यथोचित स्वागत सत्कार केला.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी उपस्थित मान्यवरांशी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यासह महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. पोलीस अधीक्षकांनी सर्वांकडून कायदा व सुव्यवस्थेसाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगून उपस्थित सर्वांकडून आपापले अभिप्राय व मते जाणून घेतली. सोबतच त्यांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी न पडण्याचे आवाहन युवकांना केले. कोणत्याही समाजाने आपले सण उत्सव साजरे करताना इतर समाजातील अथवा धर्मातील कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, गावात मुख्य ठिकाणी आवश्यक असलेली सीसीटीव्ही यंत्रणा, मध्य प्रदेश सीमेपूर्वी मेळघाट च्या सीमेवर वन विभागाप्रमाणे पोलीस विभागाचा चेक पोस्ट पोलीस चौकी उभारणे, हिवरखेड पोलीस स्टेशनची इमारत आणि पोलिसांची शासकीय घरे अत्यंत जीर्ण झाली असून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी उत्तम दर्जाची निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याची उपस्थितांनी मागणी केली. यावेळी माजी सरपंच सुरेश ओंकारे, सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, पत्रकार सुरज चौबे, केशवराव कोरडे, गोवर्धन गावंडे, शाहरुख लाला, शेख जमीर, पंकज अग्रवाल, पावन बजाज, राजेंद्र चणेकर, डॉ. प्रशांत इंगळे, मोईज जमादार, शांताराम कवळकार, सतीश इंगळे, राजू खान, हिफाजत भाई, मोहम्मद यासीन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.