डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहान येथे कोव्हिड किंवा कोरोना व्हायरसच्या उद्रेकाची सुरुवात झाली आणि पुढील काही महिन्यांत जगभरात हा आजार फैलावला. जवळपास ६० लाखांपेक्षा जास्त लोकांचा या आजारात बळी गेला, सततच्या लॉकडाऊनमुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले. आणि किती बेरोजगार झाले याची तर गणतीच नाही. पण आजपर्यंत कोव्हिडचा उगम नेमका कोठून झाला, हे मात्र अजून रहस्यच राहिले होते. या संदर्भात रिसर्च पेपर प्रकाशित झाला असून यात कोव्हिडची सुरुवात कोठून झाली या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात आले आहे.
हुनान सीफूड मार्केटमध्ये होते बाधित प्राणी
कोव्हिड १९ची सुरुवात वुहान येथील हुनान सीफूड मार्केट येथून बाधित प्राण्यांतून झाली, असा निष्कर्ष ‘सेल जर्नल’ या नियतकालिकातील रिसर्च पेपरमधून काढण्यात आला आहे. वुहानमधील या बाजारात प्राण्यांची विक्री खाण्यासाठी म्हणून केली जाते. कोव्हिडचा उद्रेक झाल्यानंतर जानेवारी महिन्यात हे मार्केट बंद करण्यात आले. त्यानंतर चीनमधील अधिकाऱ्यांनी येथून बरेच सँपल गोळा केले होते. या सँपलमध्ये मार्केटमधील एका स्टॉलमधील बरेच नमुने कोरानाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राणी ठेवण्याचे कार्ट, पिंजरे, डस्टबीन, प्राण्याचे केस आणि पक्षांची पंख काढायचे मशिन या सर्वांवर कोव्हिड १९ हा व्हायरस दिसून आला आहे.
या मार्केटमध्ये मिळून आले SARS CoV 2
डिसेंबर २०१९ च्या अखेरीस या मार्केटमध्ये रकूनसारखे जंगली प्राणी विक्रीला ठेवले होते, हे स्पष्ट झालेले आहे. “हे प्राणी ज्या ठिकाणी मिळून आले त्याच ठिकाणी कोव्हिड १९साठी कारणीभूत ठरणारा SARS CoV 2 हा व्हायरस मिळून आला आहे,” असे या पेपरमध्ये म्हटले आहे. संशोधक फ्लोरेन्स डेबारे म्हणाले, “या व्हायरसमधील सुरुवातीची विविधता या मार्केटमधून दिसून आली आहे. त्यामुळे येथून कोव्हिडचा उद्रेक सुरू झाला असा निष्कर्ष काढता येतो.”
कोव्हिड फैलावण्याच्या दोन शक्यता
या संशोधनातून दोन शक्यता व्यक्त होत आहेत. एक म्हणजे ‘कोव्हिड’ने बाधित झालेला प्राणी या बाजारात आणला गेला असेल, आणि तेथून माणसांना याची लागण होण्यास सुरुवात झाली. तर दुसरी शक्यता अशी आहे की एखाद्या व्यक्तीला ‘कोव्हिड’ ची बाधा झाली. असेल आणि तो या बाजारात आला, आणि कोव्हिडचा फैलाव सुरू झाला. जीवशास्त्रज्ञ मायकल वोरोबे म्हणतात, “कोव्हिड ची बाधा झालेले प्राणी त्या काळात या बाजारात नव्हते, असे आता म्हणता येणार नाही. त्यांचे डीएनए आणि आरएनए तेथे होते, हे स्पष्ट झालेले आहे.”