मुंबई : कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले तरच आयटी क्षेत्रात नोकरी हमखास, असे चित्र यंदा अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशात दिसून आले. राज्यातील सर्वच विभागांत कॉम्प्युटर किंवा आयटी इंजिनिअरिंगसाठी कल दिसून आला. याबरोबरच एमसीए, एमबीए, कृषी आणि नर्सिंग आदी अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांची पसंती दिसून आली आहे. सीईटी सेलअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अंतिम टप्प्याकडे पोहोचले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. अभियांत्रिकी पदवी प्रवेशात गेल्या पाच ते सहा वर्षांच्या तुलनेत विक्रमी प्रवेश झाले आहेत. यापाठोपाठ एमबीए, एमसीए महाविद्यालयांतही प्रवेशात वाढ झाली आहे.
एमसीए अभ्यासक्रमासाठी गतवर्षी 12 हजार 883 इतक्या जागा होत्या. या जागांवर 10 हजार 203 प्रवेश झाले होते. यंदा 15 हजार 224 इतक्या जागा होत्या. त्यापैकी 13 हजार 922 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत; तर एमबीए अभ्यासक्रमासाठी 42 हजार 511 जागा गतवर्षी होत्या. त्यापैकी 33 हजार 340 प्रवेश झाले होते. यंदा 46 हजार 719 जागांपैकी 42 हजार 174 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. एमबीए महविद्यालयांचे प्राचार्य सांगतात की, कोणत्याही क्षेत्राचा अथवा संस्थेचा विकास करण्यासाठी उत्तम व्यवस्थापन आणि नियोजनाची गरज असते. त्यासाठी एमबीएला महत्त्व आहे, तर आधुनिक काळात सर्व गोष्टी कॉम्प्युटरवर आधारित झाल्याने मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनलाही महत्त्व आले. यातही पदवीबरोबरच उत्तम पगाराची नोकरी उपलब्ध होत असल्याने तरुणांचा ओढा वाढत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाला आतापर्यंत 79.12 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ही प्रवेश प्रक्रिया अजून सुरू आहे. 15 हजार 928 जागा आहेत. या जागांपैकी 10 हजार 980 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहेत. गेल्यावर्षी 7 हजार 182 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. बी.एस्सी. नर्सिंग हा इयत्ता बारावी (विज्ञान) नंतर 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. मागील वर्षापर्यंत नीट ही प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना नर्सिंगसाठी प्रवेश मिळत असे, आता सीईटी सेलकडून परीक्षा घेतली जाते. त्याआधारे प्रवेश घेतला असल्याने प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये विद्यार्थिनींबरोबर विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेतले आहेत.
कृषी अभ्यासक्रमांतील नऊ विद्याशाखांपैकी बी.एस्सी. अॅग्री, बी.एस्सी. फॉरेस्ट्री, बी.एस्सी. हॉर्टिकल्चर आणि बी.एफ.एस्सी. आणि बी.एस्सी. अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट या विद्याशाखांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. यंदा 9 कृषी अभ्यासक्रमांचे 75 टक्के प्रवेश झाले आहेत. यंदा राज्यात 18 हजार 177 जागा होत्या, त्यापैकी 13 हजार 626 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या राज्यभरात 354 संस्था असून, या संस्थांमध्ये यंदा 1 लाख 80 हजार जागा होत्या. त्या जागांवर 1 लाख 48 हजार 991 इतके प्रवेश झाले. मुंबई,
पुणे आणि नाशिकमधील विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या कम्प्युटर इंजिनिअरिंगला 19 हजार 144 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्याखालोखाल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगला 12 हजार 940 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 12 हजार 882 विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली.
मुंबईतील 8 हजार 196 जागांपैकी 5 हजार 730 विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला, तर पुण्यामधील 12 हजार 63 जागांपैकी 8 हजार 533 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. नाशिकमध्ये 5 हजार 126 पैकी 3 हजार 679 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अमरावतीमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अमरावतीमध्ये 1 हजार 827 पैकी 1 हजार 393 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. औरंगाबादमध्ये 2 हजार 723 पैकी 1 हजार 805 जागांवर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला प्रवेश झाले. नागपूरमध्ये 3 हजार 562 पैकी 2 हजार 741 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
आतापर्यंत झालेले टॉप प्रवेश
अभ्यासक्रम संस्था एकूण जागा झालेले प्रवेश प्रवेशाची टक्केवारी
- एमसीए 158 15,224 13,922 91.45
- एमबीए 357 46,719 42,174 90.27
- बीई, बीटेक 354 1,80,006 1,48,991 82.77
- नर्सिंग 209 10,980 8,687 79.12
- कृषी 207 18,177 13,626 74.96