नागपूर : नीट परीक्षेतील भौतिकशास्त्र व वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकासंदर्भात आक्षेप घेत एका विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आता दोन समित्यांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. शौरिन आंबटकर असे या याचीकर्त्यांचे नाव असून न्यायालयाने या दोन समित्यांमार्फत आरोपांची सत्यता पडताळून बघण्याचे आदेश दिले आहेत.
गेले काही दिवस नीट 2024 अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट परीक्षा वादाच्या भोवऱ्यात आहे. या परीक्षेचा घोळ अनेक दिवस संपलेला नाही. या विद्यार्थ्याने दाखल केलेल्या याचिकेनुसार भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला 11 व्या क्रमांकाचा किरणोत्सर्जनाबाबतचा प्रश्न हा अभ्यासक्रमाबाहेरील होता. नीट 2022 (पेज क्रमांक 121) व नीट 2023 (पेज क्रमांक 135) मधील भौतिकशास्त्राच्या अभ्यासक्रमात आठव्या धड्यात किरणोत्सर्जन विषयाचा समावेश होता. मात्र नीट 2024 मध्ये हा विषय अभ्यासक्रमातून वगळण्यात आला असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. या सोबतच वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 148 क्रमांकाचा प्रश्न चुकीचा असून हा प्रश्न त्याने सोडविण्याचा दावा देखील केला.
त्यामुळे प्रकरण तीन, 3.2 (डी), (4) नुसार या दोन्ही प्रश्नाचे चार-चार गुण आपल्याला देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने केंद्र शासनाच्या उच्च शिक्षण विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सचिवांना, एनटीए राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, आरोग्य विज्ञान विभागाच्या महासंचालकांसह इतर प्रतिवादींना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पुढील सुनावणी शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे.
या दोन्ही प्रश्नावरील आक्षेपाच्या पडताळणीसाठी न्यायालयाने समिती स्थापन करण्याचे आदेश देतानाच वनस्पती शास्त्र विषयातील प्रश्नासाठी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एसएफएस कॉलेज आणि शिवाजी सायन्स कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नासाठी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, व्हिएनआयटी आणि एलआयटी कॉलेजमधील भौतिकशास्त्र विभागप्रमुख यांची समिती तयार करण्यात आली आहे. आता या समितीच्या अहवालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.