अकोला, दि.7 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे (अमृत) राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. पात्र व्यक्तींनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय समन्वयक देवदत्त पंडित यांनी आज केले. प्रबोधिनीतर्फे खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळातर्फे योजनांचा लाभ मिळत नाही अशा आर्थिक दुर्बल घटकांना अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यात उद्योजकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व परशुराम गट कर्ज व्याज परतावा योजना राबवली जाते.
रोजगारक्षम कौशल्य विकासासाठी स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी उत्पन्नाधारित उद्योग प्रशिक्षण, शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा, ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण, रोजगार, नोकरी सहाय्य, तसेच औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी तांत्रिक रोजगारक्षम प्रशिक्षण, सी-डॅक माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय, उद्योग इन्क्युबेशन सेंटर, किशोर विकास उपक्रम आदी राबवले जाते, अशी माहिती अकोला येथील जिल्हा समन्वयक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
शैक्षणिक अर्थसाह्य
आयआयटी, आयआयएम, आयुर्विज्ञान संस्था अशा संस्थांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य, तसेच युपीएससी नागरी सेवा, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि एमपीएससी राजपत्रित व अराजपत्रित पदांच्या परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्य ही योजना राबविण्यात येत आहे, असे श्री. कुलकर्णी यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9730151450 किंवा (020) 29999096 या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे, www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध आहे, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.