अकोला,दि.7 : सामाजिक न्याय विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी सुरू असून, पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त एम. डब्ल्यू. मून यांनी केले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी स्वाधार योजनेत आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येते.
त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० जुलैपासून सुरू आहे. पात्र विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज व आवश्यक कागदपत्रे जमा करून त्याची प्रत समाजकल्याण कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील कार्यालयात किंवा संपर्क साधावा.