पुढील २ दिवसांत गुजरातसह कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यानंतरही या भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने बुधवारी सांगितले. मध्य भारतात पुढील २ दिवसांत मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच्या ३ दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर कायम
तसेच आज कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. २४ ते २५ जुलै दरम्यान मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही २४ ते २६ जुलै दरम्यान पावसाचा जोर कायम राहील. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २४ ते २८ जुलै दरम्यान पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील घाट भागातही तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.
पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट
पुणे, सातारा जिल्ह्यात उद्या २५ जुलै अतिवृष्टी होईल. तर कोल्हापुरात आज, उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून पुढील चोवीस तासांत धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरु करून नदीमध्ये १६०० घनफूट प्रतिसेकंद (क्यूसेक्स) पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ४२ फूट ५ इंच इतकी होती. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूट इतकी आहे.