हिवरखेड(धीरज बजाज)– 23 जुलै रोजी सादर होणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर अकोट मुंबई मेळघाट एक्सप्रेस सुरू करा यासह पश्चिम विदर्भातील अनेक रेल्वे सेवांसाठी अनेक महत्त्वपूर्ण मागण्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारकडे केल्या आहेत.
अकोला बुलढाणा जिल्ह्यासह पश्चिम विदर्भावर रेल्वे विभागाने सतत अन्याय केलेला असून अकोट तेल्हारा तालुका, बुलढाणा जिल्हा यासह पश्चिम विदर्भात रेल्वेचे जाळे अत्यंत कमी असणे हा याचा स्पष्ट पुरावा आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अकोट खंडवा इंदोर ही रेल्वे सेवा सुद्धा गेज परिवर्तन पूर्ण झाले नसल्याने तब्बल सात वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या परिसरातील लाखो नागरिकांचा आक्रोश असूनही संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतले का असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे.
विविध शहरांमध्ये जाण्यासाठी नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे, गेज कन्वर्जन पूर्ण करणे, नवीन अत्यावश्यक रेल्वेमार्गांसाठी सर्वेक्षण करून मंजूरात देणे, आणि इतर मूलभूत पायाभूत रेल्वेसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हिवरखेड विकास मंच चे संयोजक धिरज संतोष बजाज आणि बुलढाणा जिल्हा भाजपा कोषाध्यक्ष श्याम अकोटकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्यासोबत चर्चा करून विविध रेल्वे मागण्यांसाठी त्यांना साकडे घातले होते. जाधव यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मकता दर्शवून तात्काळ पुढाकार घेऊन याबाबत मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णवजी, केंद्रीय वित्तमंत्री मा. निर्मलाजी सितारमन, रेल्वे बोर्डचे चेअरमन, अध्यक्ष, सीआरबी, महाप्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, महाप्रबंधक मध्य रेल्वे, यांच्यासह रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार केला असून महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या
1) अकोट येथून अकोला वाशीम हिंगोली मार्गे मुंबई करिता नवीन मेळघाट एक्सप्रेस सुरू करावी.
2) अकोट- आम्ला खुर्द- खंडवा आणि खंडवा ते इंदोर चे गेज परिवर्तन कार्य लवकरात लवकर पूर्ण करावे.
3) पश्चिम विदर्भ मध्ये रेल्वे मार्गाचे जाळे अत्यंत कमी असल्याने लक्षावधी रेल्वे प्रवाशांसाठी भविष्यकालीन उपाय योजना म्हणून तेल्हारा शहर रेल्वेला जोडण्यासाठी हिवरखेड- तेल्हारा- शेगाव ह्या जवळपास 55 कीलोमीटर नवीन रेल्वेमार्गासाठी सर्वे करून तो सर्व्हे मंजूर करावा तसेच त्या रेल्वेमार्गाचे काम करावे.
4) जालना खामगाव प्रस्तावित रेल्वे मार्गाचा विस्तार शेगाव पर्यंत करण्यात यावा.
5) अकोट-अंजनगाव-अचलपूर चांदूरबाजार या नवीन रेल्वे मार्गाचा सर्वे करून मंजुरात देण्यात यावी.
6) दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद SCR द्वारे नांदेड डिव्हिजन वर सतत अन्याय केला जात आहे म्हणून नांदेड डीव्हिजनला दक्षिण मध्य रेल्वे SCR झोन मधून काढून मध्य रेल्वे CR मध्ये जोडावा.
7) अकोला आणि अकोट येथून नवीन रेल्वे सूरू होऊ शकेल त्याकरिता अकोला आणि अकोट स्टेशनवर पिट लाईन मंजूर करून पिट लाईनचे निर्माण लवकर केले जावे. आणि अकोला येथे रेल्वे गाड्यांची लहान सहान मेंटेनन्स व्यवस्था केली जावी.
8) अकोला येथील दक्षिण मध्य रेल्वे SCR आणि सेंट्रल रेल्वे CR च्या सर्व प्लॅटफॉर्म चे सर्व ट्रॅक आपसात जोडले जावे.
9) अकोला ते अकोट या मार्गावरील सर्व लुप लाईन ह्या मेन ट्रॅक ला तात्काळ कनेक्ट करण्यात याव्या.
10) अकोला वरून किंवा अकोला पर्यंत चालणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचा विस्तार अकोट पर्यंत करण्यात यावा.
11) हिवरखेड मोठे शहर असल्याने आणि 50 च्या वर गावे संलग्न असल्याने हिवरखेड येथे मोठे स्टेशन बनविण्यात यावे व तेथे भविष्यात सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा.
12) अकोला अकोट खंडवा इंदोर हा मार्ग उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा आणि महत्वपूर्ण मार्ग असल्याने गेज कन्वर्जन करताना अप-डाऊन डबल ट्रॅक सुद्धा टाकला जावा आणि विद्युतीकरणचे कार्य पूर्ण केले जावे.
13) देशाची राजधानी दिल्ली सहित महत्त्वपूर्ण गंतव्यस्थानी जाण्यासाठी अकोट येथून नवीन रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी. अशा महत्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत.
प्रतिक्रिया
पश्चिम विदर्भातील रेल्वे संबंधित मागण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत सतत प्रयत्न करणार आहे. प्रतापराव जाधव केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार.
प्रतिक्रिया
अनेक रेल्वे मागण्यांसाठी हिवरखेड विकास मंच आणि अनेक रेल्वेप्रेमी सतत पाठपुरावा करीत असून केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव यांनी हिवरखेड विकास मंच व शामभाऊ आकोटकर यांच्या विनंतीची दखल घेऊन केंद्राकडे पाठपुरावा सुरू केल्याने बहुतांश रेल्वे मागण्या मान्य होण्याचा आम्हाला विश्वास आहे…. धिरज संतोष बजाज संयोजक हिवरखेड विकास मंच