वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रीय चाचणी संस्थे (NTA) ने १,५६३ विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. एनटीने नीट यूजी (NEET-UG) २०२४ च्या सर्व विद्यार्थ्यांच्या रँकमध्ये सुधारणा केली आहे. “NEET(UG) 2024 च्या सर्व विद्यार्थ्यांचे सुधारित स्कोअर कार्डे (२३ जून २०२४ रोजी पुनर्परीक्षेत बसलेल्या १,५६३ उमेदवारांसह) https://exams.nta.ac.in/NEET या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आल असल्याचे एनटीएने म्हटले आहे. नीट परीक्षेत कथित पेपरफुटी आणि गैरप्रकार झाल्याचे आरोप झाल्याने राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) वादात सापडली आहे. नीट परीक्षेतील निकालात १,५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यावरून देशभरात आंदोलन करण्यात आली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.
एनटीएने १,५६३ विद्यार्थ्यांचा २३ जून रोजी झालेल्या NEET UG 2024 च्या पुनर्परीक्षेचे निकाल जाहीर केला आहे. NEET UG पुनर्परीक्षेसाठी final answer key ३० जून रोजी दुपारी १:३० वाजता प्रसिद्ध केली होती. ज्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा वेळ वाया गेल्यामुळे ज्यांना पूर्वी ग्रेस गुण मिळाले होते त्यांच्यासाठी ही पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. १,५६३ पात्र पैकी ८१३ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी बसले होते. जी त्यांच्या ६ शहरांमध्ये पण वेगवेगळ्या केंद्रांवर घेण्यात आली होती.
टॉपर्सची संख्या ६१ पर्यंत खाली आली
NTA सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ८१३ विद्यार्थ्यांपैकी कोणीही ७२०/७२० गुण मिळवू शकले नाहीत. तर टॉपर्सची संख्या ६७ वरून ६१ वर आली आहे. यापूर्वी ७२०/७२० गुण प्राप्त केलेल्या ६ पैकी ५ विद्यार्थ्यांनी २३ जून रोजी पुन्हा परीक्षा दिली होती. त्यांना ६८० च्या वर गुण मिळाले आहेत.
किती विद्यार्थ्यांनी दिली होती NEET UG परीक्षा?
मिळालेल्या आकडेवारीनुसार, चंदीगडमधील २ विद्यार्थ्यांपैकी कोणीही परीक्षेला बसले नव्हते. एकूण ६०२ पैकी २९१ विद्यार्थी छत्तीसगडमधून, १ विद्यार्थी गुजरातमधून, ४९४ पैकी २८७ विद्यार्थी हरियाणामधून आणि २३४ विद्यार्थी मेघालयातील तुरामधून परीक्षेस बसले होते.
NEET UG 2024 च्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात इतर अनेक याचिका आहेत. त्यापैकी बहुतांश याचिकांवर ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश याआधी दिले होते. न्यायालयाने या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण रद्द झालेली गुणपत्रिका स्वीकारा अथवा फेरपरीक्षेला सामोरे जा, असे दोन्ही पर्याय दिले होते.