हिवरखेड(धीरज बजाज):- हिवरखेड चा सोमवारचा आठवडी बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध असून परिसरातील विविध गावांचे लोक बाजाराला येतात. परंतु स्वच्छ हिवरखेड सुंदर हिवरखेड या संकल्पने अंतर्गत नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणे सुरु असून आठवडी बाजारात प्रवेश करताच घाणीने आगंतुकांचे व ग्राहकांचे स्वागत होते. आणि म्हणायला आहे आठवडी बाजार.. प्रवेश करताच कचऱ्याचे ढीगार…असे म्हणत उपहासात्मक स्वरूपात हीच आहे का स्वच्छ हिवरखेड सुंदर हिवरखेड संकल्पना असे शब्द नागरिकांच्या तोंडून निघत आहेत.
हिवरखेडच्या आठवडी बाजाराला गोरगरिबांचा मॉल म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण हा आठवडी बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे शहरात श्रीमंत लोक मॉलमध्ये जाऊन एकाच ठिकाणी विविध स्वरूपाच्या वस्तू खरेदी करतात. अगदी त्याचप्रमाणे हिवरखेड शहर आणि परिसरातील 40 ते 50 खेडेगावातील नागरिक गोरगरिबांच्या या मॉलमध्ये जाऊन भाजीपाला, फळे, इतर खाद्यपदार्थ, जनरल स्टोअर्स च्या वस्तू, सौंदर्यप्रसाधने, सर्व प्रकारचे कापड, शेती उपयोगी साहित्य, मिठाई, फरसाण, शीतपेय, पाण्याचे माठ, धान्य, नाश्ता, घड्याळ, हरवलेल्या चाव्या बनविणे, विविध सणांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू अशा सर्व संसार उपयोगी साहित्याचा खजिना म्हणजे हिवरखेड च्या आठवडी बाजारातुन अतिशय माफक दरात खरेदी करतात. परंतु सोमवार च्या आठवडी बाजाराकडे नगरपरिषद हिवरखेडचे सपसेल दुर्लक्ष असून आठवडी बाजाराला विविध समस्यांनी ग्रासले आहे.
आठवडी बाजारात प्रवेश करताच कचऱ्यांचे मोठे मोठे ढिगार पाहून कीव येते. आठवडी बाजाराची नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेळीच लक्ष दिले गेले नाही तर पावसाळ्यात साथीचे आजार पसरू शकतात. विशेष म्हणजे या आठवडी बाजारात शाकाहारी भाजीपाला आणि मास मच्छी मटन ची दुकानें जवळ जवळ लागूनच असल्याने शाकाहारी लोकांची प्रचंड कुचंबना होते. शाकाहारी लोकांच्या डोळ्या देखतच दिवसभरात शेकडो निरपराध पशुपक्ष्यांची हत्या समोरच केल्या जाते. सर्वांना आपापल्या आवडीचे शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थ खाण्याचा अधिकार असला तरी सदर वस्तू विक्रीचे दुकानांची जागा वेगवेगळी आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित अंतरावर असणे आवश्यक आहे. आठवडी बाजारात मोकाट कुत्र्यांचा आणि जनावरांचा सुळसुळाट असून सदर कुत्रे वाया गेलेल्या व फेकलेले मासाचे तुकडे तोंडात नेऊन भाजीपाला व इतर वस्तूंच्या दुकानात जवळ नेऊन धिंगाणा करतात. त्यामुळे अत्यंत किळसवाण्या प्रकाराला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नगरपरिषदेने स्वच्छते सोबतच मासाची व भाजीपाल्याची दुकाने विशिष्ट अंतरावर ठेवणे आवश्यक आहे. नगरपरिषदेने सदर बाजार ठेकेदारी पद्धतीने दिलेला असून स्वच्छतेची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मग ठेकेदार आठवडी बाजाराची स्वच्छता करणार नाही तर नागरिकांचे आरोग्य खराब होऊन त्यांना मरू द्यायचे काय?? वर्षाकाठी लाखोंची कमाई करून देणाऱ्या आठवडी बाजारासाठी नगरपरिषदेची काहीच जबाबदारी नाही का?? त्यामुळे हिवरखेडचे स्वच्छता निरीक्षक जोगदंड.. स्वच्छतेबाबत ठरविणार काय मापदंड… आणि स्वच्छतेमध्ये हलगर्जी करणाऱ्यांना होईल का दंड… असे प्रश्न नागरिकांच्या मनात घर करीत आहेत.
प्रतिक्रिया:- हिवरखेड आठवडी बाजार ठेकेदारी पद्धतीने दिलेला असून स्वच्छतेची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर आहे. तरीसुद्धा लवकरच या प्रकरणी योग्य ती पावले उचलल्या जातील. रुपेश जोगदंड, प्रभारी स्वच्छता निरीक्षक, हिवरखेड नगरपरिषद.