अकोला,दि.14: राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेत निविष्ठांसाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. 23 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.
त्यानुसार नॅनो युरिया (सोयाबीन), नॅनो डीएपी (सोयाबीन), नॅनो युरिया (कापूस), नॅनो डीएपी (कापूस), मेटाल्डीहाइड सोयाबीन याप्रमाणे निविष्ठांचे वाटप होईल. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. 12 जुन 2024 पासून सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.