अकोला,दि.14 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात फळबाग पुनरूज्जीवन, शेडनेट आदी विविध लाभ मिळविण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले. अभियानात राज्यात अनुसूचित जातींसाठी 20 कोटी 83 लक्ष व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 18 कोटी 75 लक्ष निधी मंजूर आहे. त्यात फुल शेती, मसाला पीके, विदेशी फळपीक आदी क्षेत्रविस्तार, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, पॉलिहाऊस, प्लास्टिक मल्चिंग पॅक हाऊस, कांदा चाळ, फलोत्पादन, यांत्रिकीकरण आदी घटक समाविष्ट आहेत. योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, संस्था आदींना लाभ घेता येईल. या प्रवर्गातील शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in नोंदणी करावी, तसेच तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.